Gold Jewellery Hallmark : सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. सरकारने ३९२ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंक अनिवार्य केलं आहे. तसंच बनावट सोन्याबाबत काळजीपूर्वक खरेदीचं सांगण्यात आलं आहे.
मुंबई : भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. लग्नकार्यात, सणासुदीला सोन्याची मोठी खरेदी केली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सोन्याकडे एक दागिना असण्यासह गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं. अशात आगामी सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या.
३९२ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य
सरकारने सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या इतर गोष्टींसाठी हॉलमार्किंग सक्तीचं केलं आहे. आता सरकारकडून देशभरातील ३९२ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. या महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठी आणखी १२ नवे जिल्हे जोडण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंगची व्यवस्था नव्हती त्या राज्य, जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगची व्यवस्था असेल. ज्वेलर्सला BIS हॉलमार्किंगच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
सरकारने हॉलमार्किंगची व्याप्ती वाढवण्यासाठी 'हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्ट्स (थर्ड अमेंडमेंट) ऑर्डर २०२६' Hallmarking of Gold Jewellery and Gold Artefacts (Third Amendment) Order 2026, (सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींचे हॉलमार्किंग (तिसरी सुधारणा) आदेश २०२६) हा नवीन आदेश जारी केला आहे. हा आदेश बीआयएसच्या (BIS) शिफारशीनुसार जारी करण्यात आला आहे.
बनावट सोनं कसं ओळखाल?
ज्यावेळी दागिने खरेदी करता, त्यावेळी दागिन्यांवर BIS चिन्ह आहे की नाही हे तपासा. तसंच दागिन्यांवर ६ आकडी HUID कोड आहे की नाही हेदेखील पाहा. तसंच BIS Care ॲपमध्ये HUID नंबर टाकून दागिन्यांची माहिती मिळवू शकता. तसंच दागिने खरेदी केल्यानंतर, सोनं खरेदी करताना GST बिल घ्यायला विसरू नका.
बिलावरील सोन्याचं वजन आणि नेमके कॅरेट किती हेदेखील तपासा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सोन्याच्या दुकानात तुम्हाला सोन्याच्या मूळ दरापेक्षा सोनं खूप कमी दरात मिळत असेल, तर सावध व्हा. या सोन्यात बनावट आढळू शकते. त्यामुळे विश्वासू सोन्याच्या दुकानातूनच, सराफाकडूनच सोनं खरेदी करा.


