Gold Loan Tips : गोल्ड लोन घेताना पात्रता आहे म्हणून जास्त कर्ज घेऊ नका. या ५ गोष्टी माहीत नसतील तर तुमचं नुकसान होऊ शकतं. व्याजदर, छुपे चार्जेस आणि सोन्याच्या दरातील चढ-उताराचा धोका, याबद्दलची माहिती घेणं महत्त्वाचं आहे.

मुंबई : सोनं तारण ठेवून अर्थात गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्यावर कर्ज घेताना त्याच्या सर्व बाबींचा विचार करुनच पुढील पावलं उचला. सोन्यावरील कर्जाचा व्याजदर, परफेड करता न आल्यास कोणती परिस्थिती येईल, अशा गोष्टी लक्षात ठेवूनच गोल्ड लोन घ्या.

गोल्ड लोन घेण्यापूर्वी ही चूक अजिबात करू नका

सोनं न विकता गरजेच्या वेळी पैसे मिळवण्यासाठी गोल्ड लोन हा एक उत्तम पर्याय आहे. पण, आणीबाणीच्या वेळी पैसे मिळतायत म्हणून घाईगडबडीत जास्त कर्ज घेऊ नका. विशेषतः पहिल्यांदा गोल्ड लोन घेणाऱ्यांनी परतफेडीची क्षमता आधीच तपासून घ्यावी. सोन्यावर कर्ज घेताना कोणती काळजी घ्याल.

पात्रता आहे या आशेने जास्त कर्ज घेऊ नका

सोन्याचे दर १.८२ लाख रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आणि नंतर थोडे कमी झाले. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत दर चढेच आहेत. त्यामुळे, तुमच्या तेवढ्याच सोन्यावर आता जास्त कर्ज मिळेल. पण बँक जास्त कर्ज देतेय म्हणून गरजेपेक्षा जास्त रक्कम घेऊ नका. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या मूल्यावर कर्जाची पात्रता वाढली असली तरी, आपली गरज किती आणि परतफेडीची क्षमता आहे का, हे महत्त्वाचं आहे. पात्रतेपेक्षा थोडी कमी रक्कम घेतल्यास, भविष्यात सोन्याचे दर जरी कमी झाले, तरी तुमचं कर्ज सुरक्षित राहील.

छुपे चार्जेस आणि मूळ खर्च

अनेकजण गोल्ड लोन घेताना फक्त व्याजदर पाहतात. पण त्यामागे अनेक प्रकारचे खर्च दडलेले असतात. प्रोसेसिंग फी, मूल्यांकन शुल्क (appraisal charges), फोरक्लोजर चार्जेस आणि उशिरा परतफेड केल्यास लागणारा दंड, या सगळ्याचा विचार करायला हवा. तसंच, स्थानिक सोनाराऐवजी RBI मान्यताप्राप्त बँका किंवा चांगल्या NBFC कडूनच कर्ज घ्या. इथे तुमच्या सोन्याला सुरक्षित वॉल्ट स्टोरेज आणि विमा संरक्षण मिळतं.

गोल्ड लोन घेताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी -

तुमच्या गरजेपुरतेच कर्ज घ्या.

फक्त १८ ते २२ कॅरेट सोन्यावरच कर्ज मिळतं

दागिन्यांमधील खडे आणि रत्नांचं वजन वगळून शुद्ध सोन्याच्या वजनावरच कर्ज मोजलं जातं

व्याजदरासोबत प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्कही तपासा.

सोन्याचे दर कमी झाल्यास मार्जिन कॉलचा धोका -

बाजारात सोन्याचे दर अचानक घसरले, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवलेलं लोन-टू-व्हॅल्यू (LTV) गुणोत्तर बदलतं. म्हणजेच, तुमच्या सोन्याचं मूल्य कमी झाल्यावर, तुम्ही घेतलेलं कर्ज बँकेसाठी जोखमीचं ठरतं. अशावेळी बँका 'मार्जिन कॉल' देतात. म्हणजे, कर्जातील फरकाची रक्कम भरण्यासाठी अतिरिक्त पैसे मागतात किंवा आणखी सोनं तारण ठेवायला सांगतात. ज्यांनी 'बुलेट रिपेमेंट'चा पर्याय निवडला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. म्हणूनच, नियमित EMI पद्धतीने परतफेड केल्यास कर्जाचा बोजा हळूहळू कमी होतो.

परतफेडीचे पर्याय आणि कालावधी समजून घ्या -

गोल्ड लोन साधारणपणे ३ ते १२ महिन्यांच्या कमी कालावधीसाठी दिलं जातं. 

बँका प्रामुख्याने खालील परतफेडीचे पर्याय देतात -

आंशिक हप्ते (Partial installments) - दरमहा फक्त व्याज भरणे आणि शेवटी मुद्दल फेडणे

बुलेट रिपेमेंट (Bullet Repayment) - नियमित मासिक EMI तुमच्या उत्पन्नानुसार आणि कॅश फ्लोनुसार योग्य पद्धत निवडा.

बँकेकडून कोणतीही सूचना आल्यास लगेच प्रतिसाद द्या, म्हणजे तुमचं तारण ठेवलेलं सोनं लिलावात जाण्यापासून वाचेल.