- Home
- Utility News
- 1st August : आजपासून या 5 नियमांमध्ये बदल, सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम
1st August : आजपासून या 5 नियमांमध्ये बदल, सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम
मुंबई : ऑगस्ट महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी महत्त्वाच्या बदलांसह झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर, बँकिंग, यूपीआय व्यवहार, विमान प्रवास, क्रेडिट कार्ड्ससह विविध क्षेत्रांतील हे बदल जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

1. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात
1 ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ₹33.50 ची कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी ही किंमत घसरण जाहीर केली असून, याचा लाभ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लघुउद्योगांना होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी 1 जुलै रोजीही 60 रुपयांची कपात झाली होती.
2. एसबीआय क्रेडिट कार्ड विमा सुविधा बंद
एसबीआय कार्डधारकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ऑगस्टपासून एसबीआयच्या अनेक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवर असणारे मोफत हवाई अपघात विमा कवच बंद करण्यात येत आहे. विशेषतः युको बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक, पीएसबी आणि अलाहाबाद बँकेच्या सहकार्याने दिल्या जाणाऱ्या एलीट आणि प्राइम कार्ड्सवरील 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे विमा कवच रद्द करण्यात येणार आहे.
3. यूपीआय व्यवहारांचे नवे नियम
डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षा वाढवण्यासाठी 1 ऑगस्टपासून यूपीआय व्यवहारांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. थर्ड पार्टी यूपीआय अॅप्स (जसे की Paytm, PhonePe, GPay) वापरकर्ते दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकतात, तर मोबाईलशी लिंक केलेले बँक खाते 25 वेळा पाहता येणार. ऑटोपे व्यवहार निश्चित 3 वेळेच्या स्लॉटमध्येच होणार असून अयशस्वी व्यवहारांची स्थिती फक्त 3 वेळा आणि 90 सेकंदांच्या फरकाने तपासता येईल.
4. विमान इंधनाच्या किमतीत बदल
1 ऑगस्टपासून विमानाच्या इंधन (ATF - एअर टर्बाइन फ्युएल) दरातही बदल झाला आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ATF आणि LPGच्या दरात सुधारणा करतात. जर ATF ची किंमत वाढली, तर विमान प्रवास महाग होऊ शकतो. किंमत घसरल्यास प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
5. क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
वरील एसबीआय निर्णयासोबतच, इतर बँकांनीही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवरील विमा कवच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कार्डधारकांना विमा सुविधा मिळणार नाही, जी आतापर्यंत त्यांच्या कार्डच्या माध्यमातून मोफत मिळत होती.
