पेट्रोलचे दर ११५ रुपयांच्या पुढे गेल्याने रोज ३० किलोमीटर प्रवास करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक गाडी (EV) हा एक स्वस्त पर्याय वाटू लागला आहे. पेट्रोल गाडीचा महिन्याचा खर्च जास्त असू शकतो, तर इलेक्ट्रिक गाडीचा खर्च कमी असतो. पण तरीही नवी EV खरेदी करणं हा फायद्याचा सौदा आहे की नाही, हे तज्ज्ञांकडून समजून घेऊया.

Petrol vs Electric Car Monthly Cost: गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४ वेळा झालेल्या वाढीमुळे सामान्य माणसाच्या खिशाचं गणित पुरतं बिघडलं आहे. दिल्लीत पेट्रोल १०२ रुपये प्रति लिटरच्या पुढे गेलंय, तर हैदराबादसारख्या शहरांमध्ये दर ११५ रुपयांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, नोकरीसाठी किंवा कामासाठी रोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात एकच प्रश्न आहे, 'आता पेट्रोल गाडी बंद करून इलेक्ट्रिक गाडी (EV) घ्यावी का?'

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जर तुमचा रोजचा प्रवास ३० किलोमीटरच्या आसपास असेल, तर तुम्हाला कोणाच्याही बोलण्यात येण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक सोपं आणि थेट गणित घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही स्वतः ठरवू शकाल की तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट राहील.

पेट्रोल गाडीचा महिन्याचा खर्च किती?

समजा तुमच्याकडे एक सामान्य पेट्रोल कार आहे, जी शहरातल्या ट्रॅफिकमध्ये आणि एसी चालू असताना साधारणपणे १४ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. तुमचा रोजचा प्रवास ३० किलोमीटरचा आहे, म्हणजे तुम्हाला रोज साधारण २.१४ लिटर पेट्रोल लागेल. आता खर्चाचं गणित बघूया. पेट्रोलचा सरासरी दर १०२ रुपये प्रति लिटर धरला, तर तुमचा रोजचा खर्च सुमारे २१८ रुपये होईल. ३० दिवसांनुसार, महिन्याला फक्त पेट्रोलचा खर्च जवळपास ६,५४० रुपये येतो. हाच आकडा वर्षाला ७८,४८० रुपयांपर्यंत पोहोचतो.

इलेक्ट्रिक गाडीचा महिन्याचा खर्च किती येईल?

आता बोलूया EV बद्दल. समजा तुमच्याकडे एक सामान्य इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी घरी चार्ज करण्यासाठी १ युनिट विजेचा खर्च सरासरी ७ ते ८ रुपये येतो. हा दर वेगवेगळ्या राज्यांच्या वीज दरांवर अवलंबून असतो. एक सामान्य EV १ युनिट विजेमध्ये शहरात आरामात ६ ते ७ किलोमीटर चालते. म्हणजे तिचा प्रति किलोमीटरचा खर्च १.१० ते १.३० रुपयांच्या घरात येतो. तुमचा रोजचा प्रवास ३० किलोमीटर आहे. १.२० रुपये प्रति किलोमीटरनुसार, तुमचा रोजचा खर्च फक्त ३६ रुपये होईल. महिन्याचा (३० दिवस) विजेचा खर्च सुमारे १,०८० रुपये येईल. म्हणजेच, वर्षाला फक्त १२,९६० रुपयांच्या आसपास खर्च बसेल.

Petrol vs EV Car: दर महिन्याला किती बचत होईल?

जर तुम्ही पेट्रोल गाडी सोडून EV घेतली, तर दर महिन्याला तुमची ५,४६० रुपयांची (₹६,५४० - ₹१,०८०) बचत होईल. वर्षाला हीच बचत ६५,५२० रुपयांपर्यंत पोहोचेल. हे आकडे पाहून कोणालाही वाटेल की EV घेणंच जास्त फायद्याचं आहे, पण खरी मेख इथेच आहे. तज्ज्ञांच्या मते, एका सामान्य पेट्रोल कारच्या तुलनेत त्याच दर्जाची इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ३ ते ४ लाख रुपये जास्त मोजावे लागतात. जर तुमचं रोजचं रनिंग फक्त ३० किलोमीटर असेल, तर तुम्ही वर्षाला सुमारे ६५,५२० रुपये वाचवत आहात. या हिशोबाने, EV साठी दिलेले ३-४ लाख रुपये वसूल (Break-Even) करायला तुम्हाला कमीत कमी ५ ते ६ वर्षं लागतील.

EV कार खरेदी करावी की नाही?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुमची गाडी रोज फक्त ३० किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी चालत असेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या पेट्रोल गाडीवर खूश असाल, तर लगेच नवी EV घेणं तोट्याचं ठरू शकतं. पण जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करतच असाल आणि भविष्यात तुमचं रनिंग वाढणार असेल, तरच EV घेणं तुमच्यासाठी दीर्घकाळात फायद्याचं ठरेल.

EV घेण्यापूर्वी या ४ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  1. घरी किंवा ऑफिसमध्ये चार्जिंग स्टेशन आहे की नाही, हे तपासा. नसल्यास अडचण येऊ शकते.
  2. EV कार खरेदी करणं अजूनही पेट्रोल कारपेक्षा महाग आहे. तिची सुरुवातीची किंमत जास्त असते.
  3. लांबच्या प्रवासासाठी हायवेवर किंवा प्रत्येक शहरात चार्जिंग स्टेशनची सोय अजून उपलब्ध नाही.
  4. जर तुमचं रोजचं रनिंग जास्त असेल, तरच EV चा फायदा लवकर दिसून येईल.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. यात दिलेली पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या दरांची आकडेवारी ही सरासरी मायलेज, घरगुती वीज दर आणि सध्याच्या बाजारभावावर आधारित आहे. तुमच्या शहराचे दर, गाडीचे मॉडेल, ड्रायव्हिंगच्या सवयी आणि राज्याच्या नियमांनुसार हे आकडे आणि तुमची प्रत्यक्ष बचत कमी-जास्त होऊ शकते. कोणतंही नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कृपया अधिकृत डीलर्सकडून संपूर्ण माहिती घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.