EPFOने PF खातेदारांना बनावट वेबसाइट आणि फेक लिंकपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या सदस्यांना फेक लिंक आणि बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. EPFO ने सोशल मीडियाच्या माध्यमातून सदस्यांना कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची खात्री करण्याचे आवाहन केले. सायबर हल्लेखोर ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट साइट तयार करून UAN, आधार, PAN, बँक खाते आणि OTP यांसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात. त्यामुळे ऑनलाइन PF सेवा वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
फेक लिंकवर क्लिक केल्यास…
सायबर हल्लेखोर अधिकृत वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट आणि लिंक तयार करतात. या लिंक एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडिया मेसेजच्या माध्यमातून पाठवल्या जाऊ शकतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर युझर्सला युएएन, आधार, पॅन, बँक डिटेल्स, एटीएम पीन किंवा ओटीपी यांसारखी माहिती भरण्यास सांगितले जाऊ शकते.अशी कोणतीही माहिती देण्यापूर्वी वेबसाइटचा पत्ता आणि डोमेन नीट तपासणे आवश्यक आहे. युआरएलमध्ये विचित्र स्पेलिंग, अतिरिक्त अक्षरे किंवा संशयास्पद डोमेन आढळल्यास त्या वेबसाइटपासून दूर राहावे.
UAN, आधार आणि OTP कोणालाही देऊ नका
ईपीएफोने सदस्यांना अधिकृत वेबसाइटशिवाय इतर कोणत्याही वेबसाइटवर युएएन, पीपीओ, पासवर्ड, आधार, पॅन, बँक डिटेल्स किंवा ओटीपी शेअर करू नये, असेही आवाहन केले आहे. तसेच पीएफशी संबंधित कोणतीही ऑनलाइन सेवा वापरायची असल्यास SMS, ई-मेल किंवा सोशल मीडिया मेसेजमधून आलेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
ईपीएफओ कधीही OTP किंवा लॉगिन डिटेल्स मागत नाही
ईपीएफोने स्पष्ट केले आहे की, संस्था फोन कॉल, SMS, WhatsApp, सोशल मीडिया किंवा ई-मेलच्या माध्यमातून सदस्यांकडून ओटीपी, पर्सनल माहिती किंवा लॉगिन क्रेडेन्शियल्स मागत नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती मागणारा फोन, मेसेज किंवा ई-मेल आल्यास तो संशयास्पद समजावा. कोणतीही संवेदनशील माहिती देण्यापूर्वी संबंधित सोर्सची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
पीएफसाठी ऑनलाइन सेवा वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
- अज्ञात एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडिया लिंकवर क्लिक करू नका.
- वेबसाइटचा युआरएल आणि डोमेन काळजीपूर्वक तपासा.
- युएएन, आधार, पॅन, बँक डिटेल्स आणि ओटीपी कोणालाही शेअर करू नका.
- पीएफशी संबंधित सेवा वापरताना ईफीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- संशयास्पद लिंक किंवा वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरू नका.
- फिशिंग किंवा ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास संबंधित अधिकृत तक्रार यंत्रणेला माहिती द्या.


