कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात कान गमावलेल्या महिलेसाठी चीनी डॉक्टरांची अद्भुत शस्त्रक्रिया वरदान ठरली. तुटलेला कान अनेक महिने पायावर शिवून जिवंत ठेवण्यात आला. नंतर एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे तो यशस्वीरित्या पुन्हा जागेवर जोडण्यात आला.
गेल्या काही दिवसात आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर डॉक्टर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत आहेत. यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात तुटलेला कान चीनी डॉक्टरांनी तात्पुरता महिलेच्या पायावर शिवला. काही महिन्यांनंतर, चीनी सर्जन्सनी तो कान यशस्वीरित्या त्याच्या मूळ जागी पुन्हा जोडून जगातली पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. रिपोर्ट्सनुसार, तुटलेला कान डोक्यावर पुन्हा जोडण्यापूर्वी तात्पुरता पायावर शिवण्याची ही जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
अपघातात गंभीर दुखापत -
गेल्या एप्रिल महिन्यात जिनानमध्ये कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. मशीनमुळे झालेल्या या अपघातात तिच्या कवटीचा मोठा भाग आणि कान तुटला होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, 'मेड जे' (Med Ge) किंवा 'यिक्सू जी' (Yixue Jie) नावाच्या एका मेडिकल न्यूज सोशल मीडिया अकाउंटने हे प्रकरण रिपोर्ट केले आहे.
जिनानमधील शेंडोंग प्रांतीय रुग्णालयाच्या मायक्रो सर्जरी युनिटचे उपसंचालक डॉ. क्यू झेनकियांग (Qu Zhenqiang) यांनी सांगितले की, महिलेची दुखापत जीवघेणी होती. अपघातात तिची कवटी, मान आणि चेहऱ्याची त्वचा अनेक तुकड्यांमध्ये विभागली गेली होती. तर कान कवटीपासून पूर्णपणे वेगळा झाला होता, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया -
रुग्णाला रुग्णालयात आणताच मायक्रो सर्जरी टीमच्या डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कवटीची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. पण कवटीच्या ऊतींना आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला झालेल्या गंभीर नुकसानीमुळे शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. कवटीच्या ऊती बऱ्या होण्यासाठी वेळ लागणार असल्याने, सर्जन लगेच कान जोडू शकले नाहीत. त्यामुळे, शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचे शरीर तयार होईपर्यंत तुटलेला कान जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना दुसरा मार्ग शोधावा लागला.
तात्पुरता कान पायावर -
खूप चर्चेनंतर, डॉक्टरांनी रुग्णाच्या पायाच्या वरच्या भागावर कान शिवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या मते, पायातील रक्तवाहिन्या आणि शिरा कानाच्या रक्तवाहिन्यांशी जुळणाऱ्या होत्या. पायाची त्वचा आणि मऊ ऊती डोक्याच्या त्वचेप्रमाणेच पातळ होत्या, ज्यामुळे प्रत्यारोपणानंतर कमी बदलांची आवश्यकता होती. ही शस्त्रक्रिया जगात पहिल्यांदाच होत होती. सुरुवातीची शस्त्रक्रिया १० तास चालली. ०.२ ते ०.३ मिलिमीटर व्यासाच्या कानातील अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे हे सर्वात मोठे आव्हान होते, ज्यासाठी अत्यंत सूक्ष्म शस्त्रक्रियेची गरज होती. पण पाच दिवसांनंतर, व्हेनस रिफ्लेक्समुळे रक्तप्रवाहात अडथळा आला आणि कान जांभळट-काळा पडला. त्यामुळे पाच दिवसांत सुमारे ५०० वेळा बाहेरून रक्तपुरवठा करावा लागला.
कान पुन्हा जागेवर -
दरम्यान, डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटावरील त्वचा घेऊन कवटीची पुनर्बांधणी केली होती. पाच महिन्यांनंतर, सूज कमी झाली आणि शस्त्रक्रियेची जागा बरी झाली. त्यानंतर, गेल्या ऑक्टोबरमध्ये सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी कान यशस्वीरित्या त्याच्या मूळ जागी जोडला. सन (Sun) आडनावाच्या या रुग्णाला नंतर डिस्चार्ज देण्यात आला. तिचे चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊतींचे कार्य बऱ्यापैकी पूर्ववत झाले आहे, असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. तर भुवया पूर्ववत करण्यासाठी आणि पायावरील व्रण कमी करण्यासाठी आणखी काही लहान शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.


