Car market : मारुती सुझुकीसाठी 2025 हे वर्ष विक्रीच्या दृष्टीने चांगले ठरले. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला मारुतीने नेक्सा मॉडेल्स इग्निस, XL6 आणि जिम्नीवर मोठी सूट जाहीर केली आहे. ही सूट अनुक्रमे ३५,५०० आणि ३३,००० रुपयांपर्यंत आहे. 

Car market : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कार उत्पादक कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा लागल्याचे दिसते. अशा स्थितीत मारुती सुझुकीने 2025 मध्ये रेकॉर्डब्रेक विक्रीची नोंद केली आहे. विक्रीच्या दृष्टीने मारुची सुझुकीला 2025 हे वर्ष खूपच फायदेशीर ठरले आहे. 2025 डिसेंबरमध्ये 1,78,646 युनिट्सच्या विक्रीसह, मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2024 मध्ये विकलेल्या 1,30,117 युनिट्सच्या तुलनेत 37.3% वार्षिक वाढ नोंदवली. यामुळे विक्रीच्या प्रमाणात 48,529 युनिट्सची वाढ झाली. आता कंपनीने काही मॉडेल्सवर सवलतही जाहीर केली आहे.

 भारतातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी, जानेवारी 2026 मध्ये आपल्या नेक्सा मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनी मारुती सुझुकी इग्निस, मारुती सुझुकी XL6 आणि कंपनीची लोकप्रिय ऑफ-रोडिंग एसयूव्ही मारुती सुझुकी जिम्नी यांसारख्या कारवरही सूट देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन ग्राहक जानेवारी महिन्यात हजारो रुपयांची बचत करू शकतात. सवलतींबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. चला, या गाड्यांवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल अधिक जाणून घेऊया.

डिस्काउंट ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घ्या

या काळात, ग्राहकांना मारुती सुझुकी इग्निसच्या विविध व्हेरिअंट्सवर 35,500 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यामध्ये 15,000 रुपयांपर्यंतच्या रोख सवलतीचा समावेश आहे. याशिवाय, मारुती सुझुकी XL6 वर ग्राहकांना 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. तसेच, कंपनीची लोकप्रिय ऑफ-रोडिंग एसयूव्ही मारुती सुझुकी जिम्नीवर ग्राहक 33,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या ऑफरमध्ये 25,000 रुपयांपर्यंतच्या रोख सवलतीचा समावेश आहे.

या आहेत मारुती सुझुकीच्या योजना

नवीन वर्षात मारुती सुझुकी भारतीय बाजारात अनेक नवीन मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडेल्सच्या अपडेटेड आवृत्त्याही लाँच करत आहे. कंपनीच्या आगामी गाड्यांमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्टचाही समावेश आहे. मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा टेस्टिंग करताना दिसली आहे. तसेच, रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच आपली लोकप्रिय एसयूव्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रीड पॉवरट्रेनसह लाँच करू शकते.