Car market : मारुती सुझुकीची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस बाजारात धुमाकूळ घालत आहे. 70,000 हून अधिक बुकिंग आणि 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह आलेल्या या मॉडेलने, ADAS सारख्या प्रीमियम फीचर्समुळे ग्राहकांना आकर्षित केले आहे. 

Car market : भारतात गाड्यांची विक्री सध्या जोरात सुरू आहे. मारुती सुझुकीला 2025 हे वर्षं विक्रीसाठी खूपच चांगले ठरले. डिसेंबर 2025 मध्ये 1,78,646 युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकीने 37.3 टक्के वार्षिक वाढ नोंदवली. यावरूनच भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे, हे स्पष्ट होत आहे. मारुती सुझुकीच्या अल्टो, बलेनो आणि ब्रेझा यांसारख्या मॉडेल्सना ग्राहकांकडून मागणी आहे. त्यापाठोपाठ एसयूव्ही व्हिक्टोरिस ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

मारुती सुझुकीची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिसने, लाँच झाल्यानंतर काही महिन्यांतच भारतीय बाजारपेठेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हिक्टोरिसला 70,000 हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत आणि 35,000 हून अधिक युनिट्स ग्राहकांना वितरित करण्यात आल्या आहेत. हे आकडे दर्शवतात की एसयूव्ही सेगमेंटमधील मारुतीचे हे नवीन मॉडेल वेगाने लोकप्रिय होत आहे. 

हे आहेत आकडे

डिसेंबर 2025 मध्ये मारुती सुझुकीने अंदाजे 38,000 कॉम्पॅक्ट एसयूव्ही विकल्या. यात व्हिक्टोरिसने 14,000 युनिट्सचे योगदान दिले. याचा अर्थ व्हिक्टोरिसला लाँच झाल्यापासून विक्रीच्या बाबतीत जोरदार सुरुवात मिळाली आहे.

मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग आणि सेल्स) पार्थो बॅनर्जी यांच्या मते, कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 55.3 टक्के वाटा आता एसयूव्हीचा आहे. याशिवाय, 2025 या वर्षात मारुती सुझुकीने 500,000 हून अधिक एसयूव्ही विकण्याचा टप्पा गाठला आहे. व्हिक्टोरिस आणि ग्रँड विटारा व्यतिरिक्त, फ्रॉन्क्स आणि ब्रेझा या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीपैकी आहेत आणि त्यांनी या वर्षातील टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये स्थान मिळवले आहे.

व्हिक्टोरिस आणि ग्रँड विटारा एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असल्या तरी, मारुतीने तिला पूर्णपणे नवीन आणि वेगळे डिझाइन दिले आहे. या एसयूव्हीचा लूक अधिक आधुनिक आहे, जो तरुण ग्राहकांना आकर्षित करतो. तिचे केबिन देखील वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.

व्हिक्टोरिसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे फाइव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग. भारत NCAP आणि ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह-स्टार रेटिंग मिळवणारी ही पहिली मारुती कार आहे. याशिवाय, CNG व्हेरिएंटमध्ये उत्तम बूट स्पेस देण्यासाठी अंडरबॉडी टँक देखील आहे.

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसमध्ये लेव्हल 2 ADAS, 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांसारखी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. व्हिक्टोरिसला ग्रँड विटारामध्ये असलेले 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर पेट्रोल-हायब्रीड पॉवरट्रेन मिळते. यात ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) पर्याय देखील मिळतो. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख ते 19.99 लाख रुपयांपर्यंत आहे.