BYD ग्रुपचा प्रीमियम ब्रँड Denza 2026 पर्यंत आपली Z9 GT ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार आहे. 1,156 PS पॉवर, अवघ्या 2.7 सेकंदात 100 किमीचा वेग आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग अशा भन्नाट फीचर्ससह ही कार प्रीमियम सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज झाली आहे.

मुंबई : BYD ग्रुपचा प्रीमियम कार ब्रँड Denza आता भारताच्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये एन्ट्री करायला सज्ज झालाय. 2026 च्या अखेरीस Denza भारतात लाँच होईल, असा अंदाज आहे. सुरुवातीला कंपनी Z9 GT आणि D9 या दोन मॉडेल्स बाजारात उतरवू शकते.

Z9 GT ही काही साधी इलेक्ट्रिक कार नाही, तर हे एक हाय-परफॉर्मन्स प्रीमियम शूटिंग-ब्रेक मॉडेल आहे. BYD च्या सध्याच्या गाड्यांपेक्षा Denza ब्रँड जास्त महाग आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये ठेवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. या कारची सर्वात मोठी ताकद म्हणजे यात असलेलं तीन मोटर्सचं सेटअप. कारच्या पुढच्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या आहेत.

या तिन्ही मोटर्स मिळून तब्बल 850 kW म्हणजेच जवळपास 1,156 PS एवढी पॉवर जनरेट करतात. याचा पीक टॉर्क 1,210 Nm इतका आहे. एवढी प्रचंड ताकद असल्यामुळे Z9 GT अवघ्या 2.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड 270 किमी प्रति तास असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे दिसायला ही फॅमिली कार वाटत असली, तरी तिचा परफॉर्मन्स एखाद्या स्पोर्ट्स कारला लाजवेल असाच आहे.

मुंबई : रेंज आणि चार्जिंगच्या बाबतीतही Z9 GT ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यात 122.49 kWh क्षमतेची सेकंड जनरेशन ब्लेड बॅटरी वापरली आहे. WLTP टेस्टिंगनुसार, एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार जवळपास 600 किमीपर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. यासोबतच FLASH चार्जिंग हे अल्ट्रा-फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानही यात मिळतं. हे तंत्रज्ञान 1,500 kW पर्यंतच्या चार्जिंग पॉवरला सपोर्ट करतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बॅटरी 10 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत चार्ज व्हायला फक्त 5 मिनिटे लागतात.

तसंच, 10 ते 97 टक्के चार्जिंगसाठी फक्त 9 मिनिटे पुरेशी आहेत, असं BYD चं म्हणणं आहे. अर्थात, भारतात हा चार्जिंग स्पीड किती मिळेल, हे इथल्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असेल. स्पीडसोबतच Z9 GT मध्ये प्रीमियम फीचर्सवरही खास लक्ष दिलंय. यात ड्युअल-चेंबर एअर सस्पेन्शन आणि रिअर-व्हील स्टीयरिंग यांसारखे भारी तंत्रज्ञान दिले आहे.

विशेष म्हणजे, यात क्रॅब-वॉक (Crab-walk) नावाचं एक भन्नाट फीचर आहे, जे 15 डिग्रीपर्यंत काम करतं. कारची लांबी 5.1 मीटरपेक्षा जास्त असली, तरी रिअर-व्हील स्टीयरिंगमुळे अरुंद जागेत कार वळवणं आणि ट्रॅफिकमध्ये चालवणं सोपं जातं. त्यामुळे एवढी मोठी प्रीमियम कार असूनही ड्रायव्हरला ती चालवणं एकदम सोयीचं पडतं.

भारतात Z9 GT ची अधिकृत किंमत आणि फीचर्सबद्दल Denza ने अद्याप खुलासा केलेला नाही. पण सध्याच्या मार्केट अंदाजानुसार, या कारची किंमत साधारण 1.10 कोटी ते 1.50 कोटी रुपयांच्या घरात असू शकते. ही कार भारतात पूर्णपणे तयार अवस्थेत (CBU) आयात केली जाईल का, यात कोणती बॅटरी आणि चार्जिंग सिस्टीम मिळेल, तसंच भारतीय रस्त्यांवर याची खरी रेंज किती असेल, हे अधिकृत लाँचिंगच्या वेळीच स्पष्ट होईल. तरीही, 1,156 PS पॉवर, 1,210 Nm टॉर्क, 2.7 सेकंदात 100 किमीचा वेग आणि अल्ट्रा-फास्ट चार्जिंग यांसारख्या फीचर्समुळे Z9 GT भारताच्या प्रीमियम ईव्ही मार्केटमध्ये नक्कीच धुमाकूळ घालेल.