1.215 मीटर लांब आणि 0.682 मीटर व्यास असलेल्या या भव्य झुमक्यामागे अनेक महिन्यांची मेहनत आहे. 55 कुशल कारागिरांनी तब्बल 5,840 तास काम करून हा अद्भुत दागिना तयार केला आहे.
दुबईमध्ये 'जॉय अलुक्कास' ज्वेलर्सने 16 किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे भव्य झुमके तयार करून दोन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आपल्या नावावर केले आहेत. हाताने बनवलेले जगातील सर्वात जड आणि सर्वात मोठे सोन्याचे कानातले म्हणून या अनोख्या दागिन्याला गिनीज बुकमध्ये स्थान मिळाले आहे.
'मयूरा सहस्र' (ज्याचा अर्थ हजार मोर असा होतो) असं नाव दिलेल्या या 22 कॅरेट सोन्याच्या झुमक्यांचं एकूण वजन 16.514 किलो आहे. दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टमधील 'ज्वेल ऑफ जॉय' शोरूममध्ये आयोजित एका खास कार्यक्रमात यूएईचे अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांच्या हस्ते या झुमक्यांचं अधिकृत अनावरण करण्यात आलं.
1.215 मीटर लांबी आणि 0.682 मीटर व्यास असलेल्या या महाकाय झुमक्यांच्या निर्मितीमागे अनेक महिन्यांची कठोर मेहनत आहे. 55 कुशल कारागिरांनी तब्बल 5,840 तास सलग काम करून ही कलाकृती पूर्ण केली आहे.
भारतीय संस्कृतीत सौंदर्य आणि डौलाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोरावरून, तसेच दक्षिण आशियाई नववधू आणि महिला परिधान करत असलेल्या पारंपारिक घंटा-आकाराच्या झुमक्यांवरून याच्या डिझाइनची प्रेरणा घेण्यात आली आहे.
लोकांसाठी प्रदर्शनात ठेवण्यापूर्वीच, 12 ऑक्टोबर रोजी जॉय अलुक्कासला याच्या गिनीज रेकॉर्डची अधिकृत पुष्टी मिळाली होती. जॉय अलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जॉय अलुक्कास यांनी सांगितलं की, ही अनोखी कामगिरी म्हणजे दुबई शहर आणि यामागे काम करणाऱ्या कारागिरांसाठी एक भेट आहे. जॉय अलुक्कासचं हे यश केवळ एक गिनीज रेकॉर्ड नसून, पारंपारिक हस्तकला आणि आधुनिक कल्पकतेचा एक सुंदर संगम आहे.
