ॲपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असलेल्या 'आयफोन ड्युओ'च्या (iPhone Duo) आतल्या स्क्रीनला तडे जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. वॉरंटी संपल्यानंतर या फोनची स्क्रीन बदलण्यासाठी ग्राहकांना मोठा भुर्दंड पडणार असल्याचंही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

मुंबई : ॲपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'आयफोन ड्युओ' (iPhone Duo) सध्या एका मोठ्या समस्येचा सामना करत आहे. अनेक ग्राहकांनी या फोनच्या आतल्या स्क्रीनला तडे जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ॲपलने यावर तातडीने पावलं उचलत, त्यांच्या रिटेल स्टोअर्स आणि अधिकृत सर्व्हिस सेंटर्सना अशा फोनची तपासणी करून ते दुरुस्त करण्याच्या किंवा बदलून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरुवातीच्या काळात हा फोन खरेदी केलेल्या काही ग्राहकांकडून या स्क्रीनच्या समस्येबाबत तक्रारी येत आहेत.

टेक न्यूज वेबसाईट 'मॅकरुमर्स'ने (MacRumors) दिलेल्या वृत्तानुसार, ॲपलने या आठवड्यात एका अंतर्गत मेमोद्वारे या नव्या सूचना दिल्या आहेत. कंपनीने स्पष्ट केलंय की, आयफोन ड्युओच्या खूप कमी युनिट्समध्ये ही समस्या दिसून आली आहे. ज्या ग्राहकांना डिस्प्लेमध्ये अडचण येत आहे, त्यांनी थेट ॲपलकेअरशी (AppleCare) संपर्क साधावा, असं आवाहनही कंपनीने यापूर्वीच केलं होतं.

आयफोन ड्युओची स्क्रीन का क्रॅक होतेय?

ग्राहकांच्या हातात फोन पडल्यानंतर लगेचच आतल्या डिस्प्लेवर तडे जाणे आणि प्रकाशमान रेषा दिसणे, अशा तक्रारी सुरू झाल्या. विशेषतः फोनच्या मधल्या भागात असलेल्या बिजागरीच्या (Hinge) जवळ या समस्या जास्त दिसून आल्या आहेत. मॅकरुमर्सच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील एका ग्राहकाने आपला फोन २० पेक्षा कमी वेळा उघडला आणि बंद केला, तेवढ्यातच त्याच्या स्क्रीनला तडा गेला. विशेष म्हणजे, या फोनवर बाहेरून कोणतंही नुकसान झालेलं नव्हतं, असंही या ग्राहकाने स्पष्ट केलं.

हिंज सिस्टीममधील बिघाड असू शकतं कारण

या समस्येचं नेमकं कारण ॲपलने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. पण, रिपेअर वेबसाईट 'आयफिक्सिट'ने (iFixit) केलेल्या प्राथमिक तपासणीत असं समोर आलंय की, हिंज सिस्टीममधील बिघाडामुळे स्क्रीन क्रॅक होत असावी. आयफिक्सिटच्या मते, फोन फोल्ड करताना हिंजच्या आत असलेला मधला सपोर्ट बार योग्य प्रकारे आत सरकत नाही. यामुळे डिस्प्लेच्या एका विशिष्ट भागावर जास्त दाब पडतो आणि परिणामी स्क्रीनला तडे जातात. हिंजची रचना समजून घेण्यासाठी आयफिक्सिटने विविध चाचण्यांचे व्हिडीओ, पेटंट्स आणि सीटी स्कॅनचा वापर करून एक थ्रीडी मॉडेल तयार केलं आहे. मात्र, ही केवळ एक शक्यता असून ॲपलने याला दुजोरा दिलेला नाही, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

स्क्रीन दुरुस्तीचा खर्च मोठा; मोजावे लागतील ९९९ डॉलर्स

आयफोन ड्युओचा आतला डिस्प्ले बदलणं अजिबात सोपं नाही, असं आयफिक्सिटने निदर्शनास आणून दिलं आहे. आतापर्यंत तपासलेल्या फोल्डेबल फोन्सपैकी आयफोन ड्युओ दुरुस्त करायला सर्वात सोपा असल्याचं त्यांनी म्हटलं असलं तरी, रिपेरेबिलिटी स्कोअरमध्ये त्याला १० पैकी फक्त ५ गुण दिले आहेत. रिपोर्टनुसार, वॉरंटी संपल्यानंतर अमेरिकेत या फोनची स्क्रीन बदलण्यासाठी तब्बल ९९९ डॉलर्स (सुमारे ९४,८१७ रुपये) खर्च येऊ शकतो.

फोन परत मागवण्याचा निर्णय नाही; ग्राहकांनी काय करावं?

दरम्यान, स्क्रीनच्या या समस्येबाबत ॲपलने अद्याप कोणताही अधिकृत 'रिकॉल' (फोन परत मागवणे) किंवा विशेष रिपेअर प्रोग्राम जाहीर केलेला नाही. सध्याच्या तपासणी आणि दुरुस्ती प्रक्रियेनुसारच काम सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व्हिस सेंटर्सना देण्यात आल्या आहेत. जर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर तडे किंवा असामान्य प्रकाश रेषा दिसल्या, तर तुम्ही ॲपलकेअर किंवा अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधावा. तपासणीनंतर कंपनीच्या सध्याच्या नियमांनुसार फोन दुरुस्त करून दिला जाईल किंवा त्याबदल्यात नवीन फोन दिला जाईल.