ॲमेझॉनमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर ॲनी चेन तिच्या 95% कोडिंगसाठी AI टूल्सवर अवलंबून आहे. या पद्धतीमुळे तिला करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत झाली आणि अनेक प्रमोशन मिळाल्याचं तिने उघड केलं आहे. मात्र, AI ने लिहिलेल्या कोडची संपूर्ण जबाबदारी डेव्हलपरचीच असते, असा इशाराही तिने दिला आहे.
AI Coding कॅलिफोर्निया: सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या रोजच्या कामात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर आता सामान्य झाला आहे. पण कोडिंगमध्ये AI ची नेमकी किती मदत होते, याचा खुलासा ॲमेझॉनमधील एका महिला इंजिनिअरने केला आहे. ॲनी चेन नावाच्या या इंजिनिअरसाठी AI टेक्नॉलॉजी अनेकांच्या कल्पनेपेक्षा खूप मोठी भूमिका बजावत आहे. 'आज मी जो कोड लिहिते, त्यापैकी जवळपास 95 टक्के कोड AI टूल्सच्या मदतीने तयार होतो आणि माझ्या करिअरमधील प्रगतीलाही AI च कारणीभूत आहे,' असं ॲनी चेनने स्पष्ट केल्याचं वृत्त बिझनेस इनसायडरच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलं आहे.
ॲनी चेन AI बद्दल काय म्हणते?
ॲनी चेन 2022 मध्ये ॲमेझॉनमध्ये 'सॉफ्टवेअर इंजिनिअर ग्रेड I' या एन्ट्री-लेव्हल पदावर रुजू झाली. सुरुवातीला ती ग्राहकांना प्रोडक्ट्सची शिफारस करणाऱ्या 'रेकमेंडेशन सिस्टिम्स' बनवणाऱ्या टीममध्ये काम करत होती. हा तोच काळ होता जेव्हा चॅटजीपीटी (ChatGPT) आणि क्लॉड एआय (Claude AI) सारखी जनरेटिव्ह AI टूल्स जगभरात प्रसिद्ध होऊ लागली होती. या टेक्नॉलॉजीचा कामात वापर सुरू केल्याने तिची काम करण्याची पद्धतच बदलून गेली, असं ॲनी सांगते.
कोडिंगमध्ये सुरुवातीला छोटे प्रयोग म्हणून सुरू झालेला AI चा वापर नंतर तिच्या कामाचा अविभाज्य भाग बनला. सुरुवातीला काही अडचण किंवा शंका आल्यावरच ती AI चा वापर करायची. पण नंतर कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी ती थेट AI ची मदत घेऊ लागली. 'यामुळे फक्त कोड लिहिण्याचा वेग वाढला नाही, तर AI ने दिलेल्या सूचनांना प्रत्यक्षात उत्पादनांमध्ये बदलण्याची क्षमता सर्वात महत्त्वाची ठरली,' असं ती सांगते. "AI ने कोड लिहायला मदत केली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्या कल्पनांना खऱ्या उत्पादनांमध्ये बदलण्यास मदत केली," असं ॲनी चेन म्हणते.
ॲमेझॉनमधील AI
AI च्या मदतीने काम करण्याच्या या पद्धतीमुळे ॲनीच्या करिअरमध्येही मोठे बदल झाले. रेकमेंडेशन टीममधून तिला 'सॉफ्टवेअर इंजिनिअर II' म्हणून प्रमोशन मिळालं. त्यानंतर AI-केंद्रित नवीन टीममध्ये बदली झाल्यावर तिला पुन्हा प्रमोशन मिळून ती 'सिनिअर इंजिनिअर' बनली. सध्या ॲनी चेन लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLM) वापरून प्रोडक्शन सिस्टिम्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर पर्सनलाइज्ड जनरेटिव्ह AI अनुभव देणारी सिस्टिम्स तयार करणे हे या टीमचं मुख्य उद्दिष्ट आहे.
मात्र, AI कितीही मोठी मदत करत असला तरी, इंजिनिअर्सनी आपला कोड पूर्णपणे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, असा इशारा ॲनी चेन देते. AI ने लिहिलेल्या कोडची संपूर्ण जबाबदारी डेव्हलपरचीच असेल, असंही ती स्पष्ट करते. 'जर काही चूक झाली, तर डेव्हलपर्स AI ला दोष देऊ शकत नाहीत,' असा इशाराही ॲनी चेनने दिला आहे.

