एअरटेलच्या अनलिमिटेड 5G डेटा ऑफरमध्ये हॉटस्पॉट वापरण्यावर बंदी आहे का? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कंपनीने आपल्या अटी आणि शर्ती (Terms and Conditions) अपडेट केल्या असून, सध्याच्या अधिकृत नियमांमध्ये हॉटस्पॉटद्वारे डेटा शेअर करण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही.

अरटेलच्या अनलिमिटेड 5G डेटासोबत हॉटस्पॉट वापरता येतो की नाही, यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चेदरम्यान, एअरटेलने आपल्या 'टर्म्स अँड कंडिशन्स' (अटी आणि शर्ती) अपडेट केल्या आहेत. सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या नियमांमध्ये, हॉटस्पॉटद्वारे अनलिमिटेड 5G डेटा शेअर करण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅन्सच्या 'टर्म्स अँड कंडिशन्स'नुसार, ग्राहकांना चांगला 5G अनुभव देण्यासाठी '5G स्लायसिंग' (5G Slicing) नावाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. ही सुविधा फक्त 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागांमध्येच मिळेल. त्याचबरोबर, इनडोअर कव्हरेज, मोबाईल हँडसेट, सॉफ्टवेअर आणि नेटवर्कची परिस्थिती यासारख्या गोष्टींमुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सेवेच्या नियमांमध्ये कधीही बदल करण्याचा, ते रद्द करण्याचा किंवा तात्पुरते थांबवण्याचा अधिकार कंपनीने स्वतःकडे राखून ठेवला आहे.

याचदरम्यान, गुगल सर्चमध्ये दिसणाऱ्या एअरटेलच्या 'Unlimited 5G Data Offer – Terms and Conditions' च्या प्रिव्ह्यूमध्येही हॉटस्पॉटवर बंदी असल्याचा उल्लेख नाही. यात फक्त एवढंच म्हटलं आहे की, २३९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रीपेड प्लॅनवर ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा वापरता येईल.

थोडक्यात सांगायचं तर, एअरटेलच्या सध्याच्या अधिकृत नियमांनुसार हॉटस्पॉट वापरण्यावर कोणतीही बंदी नाही. पण, कंपनी भविष्यात कधीही आपल्या नियमांमध्ये बदल करू शकते, हेही तितकंच खरं आहे.