घरात झुरळं आणि मुंग्यांचा सुळसुळाट झालाय का? महागडी केमिकल्स वापरण्याऐवजी, आपल्या स्वयंपाकघरातील काही सोप्या वस्तू वापरून तुम्ही या त्रासातून कायमची सुटका मिळवू शकता.
घरात कुठेही अन्नाचा कण जरी पडला, तरी लगेच लाल मुंग्या, माश्या आणि झुरळांची फौज हजर होते. हे दिसायला त्रासदायक तर आहेच, पण यामुळे आजार पसरण्याचा धोकाही असतो.
झुरळं आणि मुंग्यांना घालवण्यासाठी सोपे उपाय
तुम्हीही याच समस्येने त्रस्त आहात का? बाजारात मिळणारे केमिकल स्प्रे वापरण्याऐवजी, आपल्या स्वयंपाकघरातील काही साध्या वस्तू वापरून ही समस्या दूर करता येते. रोज घर पुसण्याच्या पाण्यात या वस्तू मिसळून फरशी पुसल्यास, त्यांच्या वासानेच किडे घराच्या वाटेलाही येणार नाहीत.
१. पांढरा व्हिनेगर (White Vinegar)
एक बादली पाण्यात साधारण अर्धा कप पांढरा व्हिनेगर चांगला मिक्स करा. त्यानंतर, या पाण्याने संपूर्ण घर पुसून काढा. व्हिनेगरच्या वासामुळे मुंग्या आणि इतर किड्यांना घरात यायला भीती वाटते. इतकंच नाही, तर यामुळे फरशीवरचे चिकट डाग निघून टाईल्स चमकू लागतात.
२. लिंबाचा रस
घरात व्हिनेगर नसेल, तर तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. एका बादली पाण्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस मिसळून घर पुसा. लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे फरशीवरील जंतू मरतात. याच्या आंबट वासाने माश्या आणि इतर किडे दूर पळतात आणि घरात एकदम फ्रेश वाटतं.
चपातीचं पीठ फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे का? ते किती दिवस चांगलं राहतं?
३. कडुलिंबाचं पाणी
कडुलिंब हे एक नैसर्गिक कीटकनाशक आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. काही कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून चांगली उकळवा. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि घर पुसण्याच्या पाण्यात मिसळा. या पाण्याने घर पुसल्यास, कोणत्याही केमिकलशिवाय फरशी स्वच्छ होते. झुरळं, मुंग्यांसारखे किडे जवळसुद्धा येत नाहीत.
४. मीठ
हा एक खूप जुना आणि सोपा घरगुती उपाय आहे. कोमट पाण्यात दोन चमचे मीठ टाकून ते विरघळवून घ्या. या पाण्याने घर पुसल्यास मुंग्यांची रांग लगेच नाहीशी होते. वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असाही एक समज आहे.
Puri Tips: असं पीठ मळलं तर पुरी टम्म फुगेल आणि संध्याकाळपर्यंत मऊ राहील!
५. बेकिंग सोडा आणि लिक्विड सोप
स्वयंपाकघर किंवा डायनिंग हॉलची फरशी तेलकट झाली असेल, तर कोमट पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि काही थेंब लिक्विड सोप मिसळून स्वच्छ करा. यामुळे अन्नाच्या कणांमुळे येणारी दुर्गंधी निघून जाते आणि झुरळं येण्याचं प्रमाण कमी होतं. घरात लहान मुलं असतील, तर केमिकल्सऐवजी असे नैसर्गिक उपाय वापरणं आरोग्यासाठी खूपच सुरक्षित आहे. आजच या टिप्स वापरून बघा.
