Vastu Tips नवीन फर्निचरसाठी वास्तूनुसार कोणतं लाकूड शुभ मानलं जातं? घरात जड फर्निचर कोणत्या दिशेला ठेवावं? आणि फर्निचरचा आकार कसा असावा? याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, ते जाणून घेऊया.
Vastu Tips : घरात नवीन फर्निचर आलं की घराचा लुक आणि फील दोन्ही बदलून टाकतो. फर्निचर हे फक्त सजावटीचं साधन नाही, तर त्याचा घरातील ऊर्जा आणि वातावरणावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, फर्निचरची दिशा, रंग, आकार आणि त्यासाठी वापरलेलं साहित्य याचा थेट परिणाम कुटुंबातील सुख, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे, नवीन फर्निचर खरेदी करण्यापूर्वी किंवा घरात ठेवण्यापूर्वी काही महत्त्वाचे वास्तु नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, जाणून घेऊया ५ महत्त्वाच्या वास्तु टिप्स.

रंग आणि पॉलिशकडे लक्ष द्या
फर्निचरचा रंग घरातील वातावरण आणि आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करतो. वास्तूनुसार क्रीम, हलका तपकिरी, बेज किंवा लाकडाचा नैसर्गिक रंग असलेलं फर्निचर अधिक शुभ मानलं जातं. खूप गडद किंवा काळ्या रंगाचं फर्निचर टाळावं. तसेच, फर्निचरची पॉलिश स्वच्छ आणि चमकदार असावी, कारण तुटकं किंवा फिकं झालेलं पॉलिश नकारात्मकता वाढवू शकतं.
योग्य लाकडाची निवड करा
वास्तुशास्त्रानुसार फर्निचर बनवण्यासाठी सागवान (टीक), शिसम, कडुलिंब आणि अशोक यांसारखी लाकडं शुभ मानली जातात. ही लाकडं मजबूत असण्यासोबतच सकारात्मक ऊर्जेचं प्रतीकही मानली जातात. चांगल्या प्रतीचं लाकूड घरात स्थिरता आणि सुख-समृद्धी आणायला मदत करतं, असं मानलं जातं.
फर्निचर ठेवण्यासाठी योग्य दिशा निवडा
वास्तुशास्त्रानुसार सोफा, कपाट, बेड किंवा डायनिंग सेट यांसारखं जड फर्निचर घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. तर उत्तर आणि पूर्व दिशा शक्य तितकी मोकळी आणि हलकी ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
फर्निचरचा आकारही महत्त्वाचा
फर्निचर खरेदी करताना त्याच्या आकाराकडेही लक्ष द्या. वास्तुशास्त्रानुसार चौरस (Square) आणि आयताकृती (Rectangular) आकाराचे फर्निचर सर्वात शुभ मानले जातात. जास्त वेडेवाकडे, टोकदार कडा असलेले किंवा अनियमित आकाराचे फर्निचर घरात तणाव आणि असंतुलन निर्माण करू शकतात.
जुन्या फर्निचरचा वापर करताना काळजी घ्या
जर तुम्ही नवीन फर्निचर बनवत असाल, तर त्यात नवीन आणि मजबूत लाकूडच वापरलं जाईल याची खात्री करा. खूप जुन्या किंवा खराब झालेल्या फर्निचरच्या लाकडाचा पुन्हा वापर करणं टाळा. वास्तु मान्यतेनुसार, नवीन फर्निचर हे नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक असतं.


