न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. शुक्रवारी चौथा सामना होणार असून त्यापूर्वीच भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
India tour of New Zealand 2026: पुरुष आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाने षटकारांचा पाऊस पाडत नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चालू टी-२० मालिकेपूर्वीच, मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) खेळताना भारताने २,००० षटकारांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर होता. पण आता न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय फलंदाजांनी कॅरेबियन संघालाही मागे टाकले आहे. आकडेवारीनुसार, भारताने ३०१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये एकूण २,०५२ षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या नावावर २६० सामन्यांमध्ये २०२६ षटकार आहेत. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ म्हणून भारताने अव्वल स्थान पटकावले आहे.
भारताची आक्रमक फलंदाजी
न्यूझीलंडविरुद्धच्या चालू टी-२० मालिकेत भारताचा दबदबा कायम आहे. नव्या दमाच्या फलंदाजांच्या आक्रमक मानसिकतेमुळे टी-२० क्रिकेटमध्ये भारताची फलंदाजीची शैलीच बदलून गेली आहे. मोठे फटके मारण्याचा ट्रेंड आता वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. आकडेवारी पाहिली तर, षटकार मारण्याच्या बाबतीत भारत आता जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक संघ बनला आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत आधीच ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता शुक्रवारी ऑकलंडमध्ये (Auckland) दोन्ही संघ चौथ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात उतरतील.
बदलली भारताची बॅटिंग स्टाईल
क्रिकेटची आकडेवारी सांगते की, गेल्या काही वर्षांत पुरुष टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा स्ट्राईक रेट आणि षटकार मारण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताचा स्ट्राईक रेट १३०.२ होता. त्यावेळी भारतीय फलंदाज सरासरी दर २०.५ चेंडूंमागे एक षटकार मारायचे. २०२२ मध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) तुफान फॉर्ममुळे हे चित्र बदलू लागले. त्या वर्षी सूर्याने १,१६४ धावा कुटल्या होत्या. भारताचा स्ट्राईक रेट १४४.६ वर पोहोचला आणि दर १५.४ चेंडूंमागे एक षटकार येऊ लागला. २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर, भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीवर अधिक भर दिला. २०२३ मध्ये भारताचा स्ट्राईक रेट १४५.१ झाला आणि दर १३.४ चेंडूंमागे एक षटकार मारला जाऊ लागला. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. त्या वर्षी भारताचा स्ट्राईक रेट १५०.८ वर पोहोचला आणि दर १२.२ चेंडूंमागे एक षटकार पाहायला मिळाला. २०२५ मध्ये स्ट्राईक रेट थोडा घसरून १४४.८ झाला असला तरी, २०२६ मध्ये भारतीय फलंदाजीने पुन्हा नवी उंची गाठली आहे. यावर्षी भारताचा स्ट्राईक रेट १६५.७ इतका जबरदस्त आहे, जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. भारतीय फलंदाज आता दर १०.७ चेंडूंमागे एक षटकार ठोकत आहेत. याचाच अर्थ, वेगाने धावा काढण्यासोबतच मोठे फटके मारण्यावरही भर दिला जात आहे. युवा फलंदाजांची आक्रमक शैली, पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा काढण्याची मानसिकता आणि मधल्या षटकांमध्येही मोठे फटके मारण्याची ताकद, या सगळ्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये भारताने आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे.




