१९९७ साली झालेल्या सहारा फ्रेंडशिप कपमध्ये सौरव गांगुलीने पाकिस्तानविरुद्ध सलग चार वनडे सामन्यांमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकून एक अनोखा विक्रम केला होता. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये जबरदस्त कामगिरी करत गांगुलीने ही मालिका गाजवली. २९ वर्षांनंतरही हा विक्रम अजून कोणी मोडू शकलेलं नाही.
भारतीय क्रिकेटचा 'दादा' म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली, त्याच्या काळात फक्त बॅटनेच नाही, तर बॉलनेही प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणणारा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू होता. १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सहारा फ्रेंडशिप कपमध्ये त्याने केलेला एक विक्रम आजही अबाधित आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यांमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकणारा तो जगातला एकमेव क्रिकेटपटू आहे.
पाकिस्तानविरुद्ध 'दादा'ची सलग चार सामन्यांतील दमदार कामगिरी
दुसरा वनडे — ३२ धावा + २ विकेट्स!
१४ सप्टेंबर १९९७ रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेट्सनी विजय मिळवला. या मॅचमध्ये गांगुलीने आधी बॅटिंग करताना ८६ चेंडूंत ३२ धावा केल्या. त्यानंतर बॉलिंगमध्ये ९ ओव्हर्समध्ये फक्त १६ धावा देत २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अवघ्या ११६ धावांवर ऑलआऊट झाला. या अष्टपैलू कामगिरीसाठी गांगुलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.
गांगुलीची कामगिरी: ३२ धावा | ९ ओव्हर्स | १६ धावा | २ विकेट्स | प्लेअर ऑफ द मॅच
तिसरा वनडे — २ धावा + ५/१६!
१८ सप्टेंबर रोजी पुन्हा खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये गांगुली बॅटिंगमध्ये फक्त २ धावांवर आऊट झाला. पण त्याने बॉलिंगमध्ये आपल्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली.
त्याने १० ओव्हर्समध्ये ३ मेडन ओव्हर्स टाकत फक्त १६ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा संघ १४८ धावांवर ढेपाळला. भारताने हा सामना ३४ धावांनी जिंकला आणि अपेक्षेप्रमाणे गांगुलीच 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.
गांगुलीची कामगिरी: २ धावा | १० ओव्हर्स | १६ धावा | ५ विकेट्स | प्लेअर ऑफ द मॅच
चौथा वनडे — नाबाद ७५ धावा + २ विकेट्स!
२० सप्टेंबरला झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने ७ विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तानने २८ ओव्हर्समध्ये १५९/६ धावा केल्या होत्या. गांगुलीने बॉलिंगमध्ये ६ ओव्हर्समध्ये २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर बॅटिंगमध्ये त्याने जबाबदारीने खेळत ७५ चेंडूंत नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. यात ८ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. भारताने २५.३ ओव्हर्समध्येच लक्ष्य गाठले.
गांगुलीची कामगिरी: ७५* धावा | ६ ओव्हर्स | २९ धावा | २ विकेट्स | प्लेअर ऑफ द मॅच
पाचवा वनडे — ९६ धावा + २ विकेट्स!
मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तान ५ विकेट्सनी जिंकला, पण 'प्लेअर ऑफ द मॅच' पुन्हा गांगुलीच ठरला. भारताने प्रथम बॅटिंग करत २५० धावा केल्या, ज्यात गांगुलीने १३६ चेंडूंत ९६ धावांची शानदार खेळी केली. यात ५ फोर आणि २ सिक्स होते.
त्यानंतर बॉलिंगमध्येही त्याने ९ ओव्हर्समध्ये ३३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने सामना जिंकला असला तरी, गांगुलीच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यालाच पुरस्कार मिळाला.
गांगुलीची कामगिरी: ९६ धावा | ९ ओव्हर्स | ३३ धावा | २ विकेट्स | प्लेअर ऑफ द मॅच
१९९७ सहारा कप: कशी होती ही मालिका?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोरंटोमध्ये १९९७ साली सहारा फ्रेंडशिप कप ही पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. १७ सप्टेंबरचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे तो १८ सप्टेंबरला पुन्हा खेळवण्यात आला. तो सामनाही भारताने जिंकला. त्यानंतर चौथा सामना जिंकून भारताने मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. या संपूर्ण मालिकेत सौरव गांगुलीने बॅट आणि बॉलने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे तो 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरला होता.


