न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला लगेच प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार नाही, असं कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केलंय. सध्याचे ओपनर्स चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने वैभवला वाट पाहावी लागेल. तसंच, खेळाडूंनी कोणत्याही क्रमांकावर खेळायला तयार असलं पाहिजे, असंही तो म्हणाला.
क्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याबाबत मोठा खुलासा केलाय. पहिल्या टी-20 पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस म्हणाला की, संघात आल्या आल्या लगेच प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवणं वैभवसाठी सोपं नाही. त्याला आपल्या संधीची वाट पाहावीच लागेल.
वैभव सूर्यवंशीचं भविष्य उज्ज्वल आहे
वैभव अजून खूप लहान आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. अशा टॅलेंटेड खेळाडूने ड्रेसिंग रूममध्ये आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी तो आल्या आल्या थेट संघात खेळू शकत नाही. कारण आमचे ओपनर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांनी भारताला वर्ल्ड कपही जिंकून दिलाय. परदेश दौऱ्यांवर संघासोबत राहिल्याने वैभवला इथल्या वातावरणाचा चांगला अंदाज येईल. भविष्यात जेव्हा तो या खेळपट्ट्यांवर खेळायला उतरेल, तेव्हा तो पूर्णपणे तयार असेल, असं श्रेयसने समजावून सांगितलं. यावरून सध्या तरी वैभव सूर्यवंशीसाठी भारताच्या टी-20 संघाचे दरवाजे तात्पुरते बंद असल्याचं श्रेयसने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय.
मॅनेजमेंट सध्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या ओपनिंग जोडीला पूर्ण पाठिंबा देणार आहे. वैभवला टप्प्याटप्प्याने संघात सामावून घेतलं जाईल, असे संकेत श्रेयसने दिले. बॅटिंग ऑर्डर बदलण्याबाबतही अय्यरने मनमोकळेपणाने भाष्य केलं. संघाच्या परिस्थितीनुसार खेळाडूंनी जुळवून घेतलं पाहिजे, असं तो म्हणाला.
संघाची आणि परिस्थितीची गरज ओळखून बॅटिंग करायला खेळाडूंनी नेहमी तयार असलं पाहिजे. कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली तरी त्यात आनंद मानायला हवा. एखादा खेळाडू ठराविक जागेवरच बॅटिंग करेन असा हट्ट धरू शकत नाही. गेल्या वर्ल्ड कपमध्ये ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता, आता तो नंबर 1 बॅटर आहे. मी स्वतः वरच्या क्रमांकावरच बॅटिंग करेन असा हट्ट करत नाही, कोणत्याही जागेवर खेळायला मी तयार आहे, असं श्रेयसने स्पष्ट केलं.
पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11:
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.







