रवी कुमार रावत या फॅनने आपला लाडका क्रिकेटर हार्दिक पंड्याला भेटण्यासाठी लखनौ ते बंगळुरू अशी तब्बल २३०० किमीची पायपीट केली. बंगळुरूत रिहॅब करत असलेल्या हार्दिकने या फॅनची भेट घेतली आणि त्याला परतीचं फ्लाईट तिकीट काढून देत सगळ्यांची मनं जिंकली.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रवी कुमार रावत नावाच्या एका फॅनने हार्दिकला भेटण्यासाठी लखनौवरून मुंबई आणि तिथून थेट बंगळुरूपर्यंत पायी प्रवास केला. या फॅनला भेटून हार्दिकने जे केलं, त्याचं सगळीकडे कौतुक होतंय.
हार्दिक पंड्या सध्या बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये आपल्या घोट्याच्या दुखापतीवर रिहॅब करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनधिकृत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये त्याची निवड झाली होती. पण, दुखापतीमुळे त्याने या सीरिजमधून माघार घेतली.
मे महिन्यापासून हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो बंगळुरूमध्ये रिकव्हर होत असल्याची माहिती रवीला मिळाली. आपल्या लाडक्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी या फॅनने थेट पायी प्रवास सुरू केला.
हार्दिकला भेटण्यासाठी २००० हून अधिक किलोमीटरची पायपीट
रवी कुमार रावतचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लखनौवरून तो पायी चालत मुंबईला पोहोचला. हे अंतर तब्बल १४०० किलोमीटर होतं. पण मुंबईत आल्यावर त्याला समजलं की हार्दिक रिकव्हरीसाठी बंगळुरूला गेलाय.
प्लॅन बदलला तरी रवीने हार मानली नाही. त्याने मुंबईवरून बंगळुरूपर्यंतचा आणखी ९९० किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला. अखेर तो बंगळुरूच्या बीसीसीआय CoE मध्ये पोहोचला आणि ज्याच्यासाठी त्याने अर्धा देश पायी पालथा घातला, त्या हार्दिकची त्याने भेट घेतली.
एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर या भेटीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत हार्दिक आपल्या या जबरा फॅनशी अगदी प्रेमाने बोलताना दिसतोय. रवीच्या पाठीवर एक बॅग आणि हातात पोस्टर होतं. एवढी मोठी पायपीट करून आलेल्या या फॅनला पुन्हा चालत जावं लागू नये, म्हणून हार्दिकने त्याला थेट परतीचं फ्लाईट तिकीट काढून दिलं.
एवढंच नाही तर, 'काही लागलं तर सांग', असंही हार्दिक त्याला म्हणाला. हार्दिकच्या या साधेपणाने इंटरनेटवर सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
२०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी हार्दिक स्वतःला पूर्णपणे फिट करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठीच तो सध्या बंगळुरूमध्ये घाम गाळतोय. आगामी मोठ्या स्पर्धा पाहता, तो लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
मुंबईवरून चालत आलेल्या फॅनला भेटून हार्दिकने जिंकली मनं
लखनौ ते बंगळुरू असा तब्बल २३९० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या फॅनला भेटून हार्दिकने जे फ्लाईट तिकीट दिलं, त्यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. एक्सवर क्रिकेट फॅन्स हार्दिकच्या या दिलदारपणाचं भरभरून कौतुक करत आहेत.
अनेकांनी हार्दिकच्या या कृतीला 'माणुसकीचं दर्शन' म्हटलंय. एका युझरने लिहिलंय की, '२३९० किलोमीटर चालत येणं ही साधी गोष्ट नाही.'
तर दुसऱ्या एकाने लिहिलंय, 'खरे मोठेपण फक्त रन्स आणि रेकॉर्ड्समध्ये नसतं, तर जर्सीच्या आत असलेल्या हृदयात असतं.'
न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी-२० आणि वनडे स्क्वॉडमध्ये हार्दिकला विश्रांती देण्यात आली आहे. वर्कलोड मॅनेजमेंट आणि रिकव्हरीसाठी सिलेक्टर्सनी त्याला हा वेळ दिला आहे.
हे पण वाचा: विराट कोहलीचं लिंक्डइनवर पदार्पण: स्टार बॅटर आता इन्व्हेस्टर आणि फाउंडरच्या भूमिकेत








