भारताचा स्टार स्पिनर आर. अश्विनने आतापर्यंतच्या सर्वोत्तम तीन भारतीय टेस्ट बॅट्समनची निवड केली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने या यादीतून सुनील गावसकरांना वगळलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

चेन्नई: सुनील गावसकरपासून ते वीरेंद्र सेहवागपर्यंत, भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक दिग्गज बॅट्समन होऊन गेले ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घातला. पण यापैकी भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्तम तीन टेस्ट बॅट्समन निवडणं हे फिरकीपटू आर. अश्विनसाठी खूपच अवघड काम होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अश्विनने आधी टॉप-5 आणि नंतर टॉप-3 भारतीय टेस्ट बॅट्समनची निवड केली.

पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला, जेव्हा अश्विनने या यादीतून सुनील गावसकर यांचं नाव वगळलं. अनेक चाहते गावसकरांना भारताचे नंबर-1 टेस्ट बॅट्समन मानतात. त्यामुळे अश्विनच्या या निवडीवर सोशल मीडियावर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. आपली ही निवड अनेकांना पटणार नाही, हे अश्विनने स्वतःच मान्य केलं. विशेष म्हणजे, टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात १०,००० रन्सचा टप्पा पार करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू होते.

आपल्या १२५ टेस्ट मॅचच्या करिअरमध्ये ओपनर म्हणून खेळताना गावसकरांनी ५१.१२ च्या सरासरीने १०,१२२ रन्स केले आहेत. यामध्ये ३४ शतकं आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्या काळातल्या खतरनाक वेस्ट इंडिजच्या बॉलिंगसमोर त्यांनी १३ शतकं ठोकली होती. जवळपास दोन दशकं टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. नाबाद २३६ हा त्यांचा सर्वाधिक स्कोअर आहे. एवढं सगळं असूनही अश्विनच्या टॉप-3 यादीत गावसकरांना स्थान मिळालं नाही.

अश्विनच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश आहे, ज्याच्या नावावर टेस्टमध्ये अनेक रेकॉर्ड आहेत. सचिनने २०० पेक्षा जास्त टेस्ट मॅचमध्ये ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ रन्स केले आहेत, ज्यात ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकं आहेत. यादीतलं दुसरं नाव आहे राहुल द्रविड. द्रविडने १६४ टेस्टमध्ये ५२.३१ च्या सरासरीने १३,२८८ रन्स केले आहेत.

टेस्टमध्ये सर्वाधिक बॉल खेळण्याचा (३१,२५८) आणि क्रीजवर सर्वाधिक वेळ घालवण्याचा (४४,१५२ मिनिटं) वर्ल्ड रेकॉर्ड द्रविडच्या नावावर आहे. परदेशातील अवघड पिचवरही त्याची कामगिरी जबरदस्त होती आणि त्याने ३६ शतकं केली आहेत. अश्विनच्या यादीतील तिसरा खेळाडू म्हणजे विराट कोहली. कोहलीने १२३ टेस्टमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० रन्स केले आहेत.

YouTube video player