कतारमध्ये होणाऱ्या रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी इंडिया 'अ' टीमची घोषणा झाली आहे. या टीमची कॅप्टन्सी तिलक वर्माकडे सोपवण्यात आली असून, रजत पाटीदार व्हाईस कॅप्टन असणार आहे. सिलेक्टर्सनी यंदाच्या टीममध्ये मोठे बदल केले आहेत.

मुंबई : कतारची राजधानी दोहा येथे १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान एशियन क्रिकेट कौन्सिलचा (ACC) मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी इंडिया 'अ' टीमची घोषणा झाली असून, तिलक वर्माकडे टीमची कॅप्टन्सी दिली गेली आहे. तर रजत पाटीदार व्हाईस कॅप्टनची जबाबदारी सांभाळणार आहे. भारताचा पहिला सामना २० नोव्हेंबरला नेपाळविरुद्ध वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल स्टेडियमवर होईल. त्यानंतर २२ तारखेला याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान 'अ' टीम आमनेसामने येतील. ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना २४ नोव्हेंबरला दोहा युनिव्हर्सिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ग्राउंडवर यूएईविरुद्ध खेळवला जाईल.

ग्रुप्स आणि वेळापत्रक

या स्पर्धेत भारताला ग्रुप 'बी' मध्ये ठेवण्यात आलं आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबत पाकिस्तान 'अ', यूएई आणि नेपाळ या टीम्स आहेत. तर ग्रुप 'ए' मध्ये बांगलादेश 'अ', श्रीलंका 'अ', अफगाणिस्तान 'अ' आणि हाँगकाँगचा समावेश आहे. दोन्ही ग्रुप्समधून टॉप दोन टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील. हे सेमीफायनल सामने २६ आणि २७ नोव्हेंबरला होतील, तर स्पर्धेचा फायनल सामना २९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.

गेल्या वर्षीच्या टीमशी तुलना केली तर, सिलेक्टर्सनी यंदा टीममध्ये मोठे बदल केले आहेत. गेल्या वर्षी जितेश शर्मा आणि नमन धीर यांच्याकडे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची जबाबदारी होती. यंदाच्या टीममध्ये गेल्या वर्षीच्या टीममधील फक्त वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे आणि हर्ष दुबे यांनाच कायम ठेवलं आहे. दुखापतीतून सावरलेला फास्ट बॉलिंग ऑलराउंडर हर्षित राणा यानेही १५ जणांच्या टीममध्ये कमबॅक केलं आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बऱ्याच सामन्यांना मुकावे लागणार आहे.

इंडिया 'अ' टीम - अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), तिलक वर्मा (कॅप्टन), रजत पाटीदार (व्हाईस कॅप्टन), रिंकू सिंग, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान.