न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनची कामगिरी निराशाजनक राहिली. यावरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना आर. अश्विनने सडेतोड उत्तर दिलंय. संजूच्या जागी वैभव सूर्यवंशीला संघात घेण्याच्या मागणीवर अश्विनने आपली भूमिका स्पष्ट केली.

चेन्नई: न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यातही संजू सॅमसन फ्लॉप ठरला. यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना सोडला तर संजूने चाहत्यांची घोर निराशा केली. त्याने या मालिकेत ६७, १४, १८, ४ आणि ४ अशा धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संघात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण भारतीय संघ व्यवस्थापन आणि अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन संजूच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

या मालिकेत वैभव सूर्यवंशीला फक्त दोन सामन्यांत संधी मिळाली, ज्यात त्याने ४ आणि ४५ धावा केल्या. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला भारताने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद राखले, त्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांचा मोठा वाटा होता. संजूची आतापर्यंतची कामगिरी आणि त्याचा अनुभव पाहता संघ व्यवस्थापन त्याला पाठिंबा देत आहे. वैभव सूर्यवंशीने सध्या फक्त क्रिकेटचा आनंद घ्यावा, असं अश्विनने याआधीही अनेकदा स्पष्ट केलंय.

ट्रोलरला अश्विनचं सडेतोड उत्तर

रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात संजू अवघ्या ४ धावांवर बाद झाला. यानंतर एका युझरने सोशल मीडियावर अश्विनला टार्गेट करत कमेंट केली. त्याने लिहिलं, 'हॅलो अश्विन, तुझी पहिली पसंती असलेला संजू संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय.' यावर अश्विननेही आपल्या खास शैलीत भन्नाट उत्तर दिलं. अश्विनने लिहिलं, 'संजू माझी पहिली पसंती आहे, पण तो तुमचं फुलटाईम ऑब्सेशन आहे.'

Scroll to load tweet…

संघ निवडीवरून बाहेरून होणारी टीका आणि लोकांच्या सल्ल्यांवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच भाष्य केलं होतं. पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी गंभीरने स्पष्ट केलं होतं की, सर्वांना खूश ठेवणं हे माझं काम नाही, तर संघासाठी योग्य निर्णय घेणं हे माझं काम आहे.