IND vs NZ ODI : टीम इंडियात नव्या खेळाडूची एन्ट्री, गौतम गंभीरची कल्पक खेळी...
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्ध दुसरा वनडे जिंकूनही संघात बदल होतील, असे संकेत कर्णधार शुभमन गिलने दिले आहेत. जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनीची निवड झाली आहे. ही गौतम गंभीरची कल्पक खेळी मानली जाते.
जिंकूनही संघात बदल अटळ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली तीन वनडे सामन्यांची मालिका सध्या रंजक स्थितीत आहे. वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. हा सामना ४ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या वनडेवर आहेत. हा सामना १४ जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे. सहसा, कर्णधार जिंकलेल्या संघात बदल करण्यास तयार नसतात. पण, पहिला सामना जिंकूनही दुसऱ्या वनडेसाठी अंतिम संघात मोठे बदल होतील, असे स्पष्ट संकेत कर्णधार शुभमन गिलने दिले आहेत.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील मोठ्या बदलांवर गिल काय म्हणाले?
वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडेतील विजयानंतर कर्णधार शुभमन गिलने संघाच्या पुढील योजनांबद्दल सांगितले. आगामी सामन्यांमध्ये संघात नक्कीच बदल दिसतील, असे त्याने स्पष्ट केले. यावेळी गिलने टीम इंडियाच्या रोटेशन पॉलिसीचा उल्लेख केला.
केवळ मालिका जिंकणेच नव्हे, तर सर्व खेळाडूंना संधी देणे हे आमचे ध्येय आहे, असे तो म्हणाला. "संघातील रोटेशनबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या मालिकेत अर्शदीप सिंगने चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी मोहम्मद सिराज संघात नव्हता. आगामी वर्ल्ड कप लक्षात घेऊन, संघातील सर्व खेळाडूंना पुरेशी संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. विशेषतः भविष्यात जास्त वनडे सामने नसल्याने या मालिकेचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे," असे गिल म्हणाला. यावरून राजकोट वनडेमध्ये गोलंदाजी विभागात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनुभवी फलंदाज विराट कोहलीवर कर्णधार गिलने कौतुकाचा वर्षाव केला. रविवारी झालेल्या सामन्यात कोहलीने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यावर प्रतिक्रिया देताना गिल म्हणाला, "सध्या विराट कोहली अत्यंत सहजपणे फलंदाजी करत आहे. येथील खेळपट्ट्यांवर खेळी उभारणे खूप अवघड आहे. पण कोहली जे करतोय ते दुसरा कोणी इतक्या सहजपणे करू शकत नाही. त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. तो हाच फॉर्म कायम ठेवून आणखी धावा करेल, अशी आशा आहे," असे त्याने कौतुक केले. कठीण परिस्थितीतही कोहली आपल्या अनुभवाने सामना कसा फिरवू शकतो, हे गिलच्या बोलण्यातून स्पष्ट होते.
टीम इंडियाला मोठा धक्का... वॉशिंग्टन सुंदर बाहेर
मालिकेच्या मध्यातच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंत सराव सत्रात जखमी झाल्याने संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे, हे सर्वांना माहीत आहे. आता आणखी एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडेत सुंदरला दुखापत झाली.
त्याच्या बरगड्यांमध्ये वेदना होत असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. एकाच मालिकेत दोन महत्त्वाचे खेळाडू जखमी झाल्याने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
नशीब म्हणजे हेच... २६ वर्षीय आयुष बडोनीची एन्ट्री!
वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्याने २६ वर्षीय दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू आयुष बडोनीला अनपेक्षितपणे टीम इंडियाकडून बोलावणे आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने सुंदरच्या जागी त्याची निवड केली आहे. बीसीसीआयकडून आयुष बडोनीला बोलावणे येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ हंगामात खेळत आहे.
आयुष बडोनीची प्रतिभा ओळखण्यात सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची मोठी भूमिका आहे. गंभीर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असताना त्याने बडोनीला ओळखले होते. त्या हंगामात लखनऊकडून बडोनीला सलग संधी दिली. तो विश्वास सार्थ ठरवत बडोनीने चमकदार कामगिरी केली. आता राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा आहे.
कोण आहे आयुष बडोनी?
आयुष बडोनी हा एक आक्रमक उजव्या हाताचा फलंदाज आणि एक प्रभावी ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. मधल्या फळीत येऊन वेगाने धावा करणे आणि गरज पडल्यास विकेट्स घेणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
तो तिसऱ्या ते सातव्या क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करू शकतो. डाव उभारणे किंवा सामना संपवणे या दोन्ही गोष्टींमध्ये बडोनी निपुण आहे. दिल्ली संघाच्या विजयात त्याने अनेकदा एकहाती कामगिरी केली आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ५७ विकेट्सही घेतल्या आहेत.
आयुष बडोनीचे देशांतर्गत रेकॉर्ड्स
आयुष बडोनीचे रेकॉर्ड्स खूप प्रभावी आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २१ सामन्यांत ५७.९६ च्या सरासरीने १६८१ धावा केल्या आहेत. यात ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (वनडे फॉरमॅट) २२ डावांमध्ये ३६ पेक्षा जास्त सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० मध्ये ७९ सामन्यांत १७८८ धावा केल्या आहेत.
उर्वरित दोन वनडेसाठी भारतीय संघ!
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, आयुष बडोनी.

