IND vs WI सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ रन्सचं आव्हान भारताने संजू सॅमसनच्या नाबाद ९७ रन्सच्या खेळीमुळे सहज पार केलं. या विजयासह भारताने T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
IND vs WI T20 World Cup Super 8 Result: टीम इंडियाने रविवार, १ मार्च रोजी झालेल्या आपल्या शेवटच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने हरवून सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावून १९५ रन्स केले. या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना संजू सॅमसनने केलेल्या नाबाद ९७ रन्सच्या तुफानी खेळीमुळे भारताने १९९ रन्स करत सामना जिंकला. या शानदार कामगिरीसाठी संजू सॅमसनला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसचे सर्वाधिक रन्स
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ४० रन्स केले. त्याच्याशिवाय जेसन होल्डरने नाबाद ३७ रन्सची खेळी केली. इतर बॅट्समनमध्ये कॅप्टन शाई होप (३२), शिमरन हेटमायर (२७) आणि रोव्हमन पॉवेल (नाबाद ३४) यांनीही महत्त्वाचं योगदान दिलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेत टीमला चांगली सुरुवात करून दिली. तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
भारताची डळमळीत सुरुवात, टॉप ऑर्डर फेल
१९६ रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन फक्त १०-१० रन्स करून आऊट झाले. तिलक वर्माने १५ बॉल्समध्ये २७ रन्स केले, तर कॅप्टन सूर्यकुमार यादवने १६ बॉल्समध्ये १८ रन्सची खेळी केली.
संजू सॅमसनची जबाबदार खेळी आणि महत्त्वाच्या पार्टनरशिप्स
एका बाजूने विकेट्स पडत असताना, संजू सॅमसनने एकहाती किल्ला लढवला. त्याने आधी सूर्यकुमार यादवसोबत ३५ बॉल्समध्ये ५८ रन्सची पार्टनरशिप केली. त्यानंतर तिलक वर्मासोबत ४२, हार्दिक पंड्यासोबत ३८ आणि शिवम दुबेसोबत नाबाद २० रन्सची पार्टनरशिप करत टीमला विजयाच्या जवळ नेलं. शेवटी, रोमारियो शेफर्डच्या पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर मारून संजूने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
डेथ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजची जोरदार बॅटिंग
एकेकाळी १५ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजचा स्कोर १२५/४ होता. पण शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये त्यांनी तब्बल ७० रन्स कुटले आणि स्कोर १९५ पर्यंत पोहोचवला. रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डरने पाचव्या विकेटसाठी ३५ बॉल्समध्ये नाबाद ७६ रन्सची पार्टनरशिप केली. त्याआधी कॅप्टन शाई होप आणि रोस्टन चेस यांनी ५३ बॉल्समध्ये ६८ रन्स जोडले होते. आता ५ मार्चला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.


