Cricket News : किशोरवयीन वैभव सूर्यवंशी हा भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवणार का, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. 27 मार्चला तो वरिष्ठ संघात खेळण्यासाठी आवश्यक असलेली 15 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण करेल, त्यानंतर निवड समिती त्याचा विचार करू शकेल.

(Cricket News) मुंबई : या महिन्यात होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धसाठी (Under-19 World Cup) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात बिहारचा उदयोन्मुख धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली तसेच विजय हजारे क्रिकेट स्पर्धा गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्याचबरोबर सूर्यवंशीचा टीम इंडियात प्रवेश कधी होईल, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

नवीन वर्षात भारतीय क्रिकेट चाहते किशोरवयीन खेळाडू वैभव सूर्यवंशीकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. भारतीय वरिष्ठ संघात सामील होण्यामधील त्याचा तांत्रिक अडथळा मार्चमध्ये दूर होईल. वैभव हा एक असा किशोरवयीन खेळाडू आहे, जो आपल्या वयापेक्षा जास्त चांगली फलंदाजी करतो. गेल्या वर्षी खेळलेल्या सर्व स्पर्धांमध्ये 14 वर्षीय वैभवने विक्रमी धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या वैभवने 19 वर्षांखालील भारतीय संघातही चमकदार कामगिरी केली आहे.

सचिन तेंडुलकरला जसे सोळाव्या वर्षी भारतीय संघात स्थान दिले गेले, तसेच वैभवलाही संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. भारतीय वरिष्ठ संघात सामील होण्यामधील त्याचा तांत्रिक अडथळा येत्या मार्चमध्ये दूर होईल. 2020 च्या आयसीसी नियमांनुसार, वरिष्ठ संघात खेळण्यासाठी खेळाडूचे वय पंधरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 27 मार्च रोजी वैभव पंधरा वर्षांचा होईल. यानंतर निवड समिती त्याचा वरिष्ठ संघासाठी विचार करू शकते. बिहारचा खेळाडू असलेल्या वैभवने सय्यद मुश्ताक अली टी-20 आणि विजय हजारे एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावून आपली क्षमता दाखवली आहे.

देशातील मुलांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार' देऊन 2025मध्ये वैभवला गौरविण्यात आले. अलीकडेच 19 वर्षांखालील विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा सूर्यवंशीने त्यात स्थान मिळवले होते. यापैकी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यवंशीच भारताचे नेतृत्व करत आहे. विश्वचषक 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे.

19 वर्षांखालील विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, डी. कुमार पटेल, डी. कुमार पटेल, डी. उद्धव मोहन, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशनकुमार सिंग, उद्धव मोहन.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद इनान, हेनिल पटेल, डी. राहुल कुमार, दीपेश, युधजित कुमार, युधजित.