IND vs NZ 3rd ODI: हॅमिल्टनमध्ये मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना एकाही चेंडूशिवाय रद्द झाला. शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना ४० षटकांचा करण्यात आला होता, पण पावसामुळे शेवटी खेळ होऊ शकला नाही.

IND vs NZ 3rd ODI: हॅमिल्टनमध्ये मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना एकाही चेंडूशिवाय रद्द झाला. शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना ४० षटकांचा करण्यात आला होता, पण पावसामुळे शेवटी खेळ होऊ शकला नाही. भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील तिसरा सामना अशाप्रकारे रद्द झाला. टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. मंगळवारचा हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली की, भारत आता या मालिकेत हरणार नाही. दुसरीकडे, मायदेशात सलग ११ वनडे मालिका जिंकणाऱ्या किवी टीमचा विजयी रथ इथेच थांबला. न्यूझीलंडने इथून पुढचे दोन सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त मालिका बरोबरीत सोडवू शकतात.

शेवटच्या दोन सामन्यांत श्रेयस अय्यरकडे नेतृत्व

मालिकेतील चौथा आणि पाचवा वनडे अनुक्रमे शुक्रवारी आणि रविवारी बे ओव्हलमध्ये खेळवला जाईल. या शेवटच्या दोन वनडे सामन्यांत श्रेयस अय्यर टीम इंडियाचं नेतृत्व करेल. शुभमन गिल टेस्ट मालिकेच्या तयारीसाठी सराव सामना खेळणार असल्यामुळे तो वनडे मालिकेतील उरलेले सामने खेळणार नाही.

टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले होते

या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने अनुक्रमे ५ विकेट्स आणि ४ धावांनी (DLS मेथडने) जिंकले होते. त्याआधी न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मालिका भारताने ३-२ ने जिंकली होती. वनडे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. ऑकलंडमधील पहिल्या वनडेत १८५ आणि वेलिंग्टनच्या दुसऱ्या वनडेत किवी टीमला फक्त १३४ धावांत ऑल आउट केलं होतं. पण हे दोन सामने जिंकूनही ग्रीन पिचवर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

न्यूझीलंडमध्ये पावसाचा फटका

न्यूझीलंडचा देशांतर्गत क्रिकेट सीझन यंदा खूप व्यस्त आहे. भारताचा दौरा संपल्यानंतर किवी टीमला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे. म्हणूनच न्यूझीलंडचा क्रिकेट सीझन थोडा लवकर म्हणजे वसंत ऋतूतच आयोजित करण्यात आला आहे. पण अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आयोजकांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यात पावसाच्या अडथळ्यांवर मात करून कसेबसे दोन कमी षटकांचे वनडे सामने पूर्ण करता आले.

पावसाचा अंदाज नाही

पुढचे सामने शुक्रवारी आणि रविवारी माऊंट माउंगानुईमध्ये होणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तिथली परिस्थिती बरीच चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या अडथळ्याशिवाय पूर्ण षटकांचा सामना पाहण्याची आशा क्रिकेट फॅन्सना आहे.