आकाश चोप्रा यांनी मुंबई इंडियन्स संघात मोठ्या बदलांचा सल्ला दिला आहे. आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी संघाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी हार्दिक पंड्याला ट्रेड करणे आणि खराब कामगिरी करणाऱ्या ट्रेंट बोल्टला रिलीज करण्याची शिफारस केली आहे.

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या मते, आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघात मोठे बदल होऊ शकतात. याची सुरुवात हार्दिक पंड्याला ट्रेड करून होऊ शकते. तसेच मागील हंगामातील निराशाजनक कामगिरीमुळे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला रिलीज करण्यालाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. जिओस्टारच्या गेम प्लॅनवर बोलताना चोप्रा म्हणाले की, मुंबईकडे आधीच अनुभव आणि स्फोटक खेळाडूंचा समतोल असलेला संघ होता. जर मागील हंगाम अपेक्षेप्रमाणे गेला असता, तर त्यांना संघात मोठे बदल करण्याची फारशी गरज नव्हती.

तरीही, खेळाडूंना रिटेन करणे किंवा रिलीज करणे या निर्णयांवर हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याचा मुद्दा मोठा परिणाम करू शकतो, असे त्यांनी सांगितले. जिओस्टारचे तज्ज्ञ चोप्रा म्हणाले, "जर गेल्या हंगामात सर्व काही सुरळीत झाले असते आणि त्यांच्या संघाकडे पाहिले तर असे वाटते की, 'काहीही बदलण्याची काय गरज आहे?' त्यांच्याकडे समतोल, अनुभव आणि आक्रमकता आहे. मग बदल का? कदाचित त्यांना भारतीय फिरकीपटू किंवा भारतीय वेगवान गोलंदाजाची गरज असेल, जे त्यांना सहज मिळेल. एवढेच त्यांना करण्याची गरज होती. मात्र आता सर्वांत मोठी चर्चा हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याबाबत सुरू आहे. येथूनच मुंबई इंडियन्सचे रिटेन्शन आणि रिलीजबद्दलचे निर्णय सुरू होतील कारण असा खेळाडू सहजासहजी मिळत नाही. पण त्याच्या बदल्यात दोन खेळाडू मिळाले तर काय?"

खेळाडूंना रिलीज करण्याबाबत मूल्यांकन

चोप्रा यांनी विदेशी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला रिलीज करण्यालाही पाठिंबा दिला. त्याच्या कामगिरी आणि मानधनाचा दाखला देत ते म्हणाले की, त्याच्यावर खर्च केलेले साडेबारा कोटी रुपये इतर अनेक खेळाडूंना संघात घेण्यासाठी वापरले जाऊ शकतात. "पाच सामने, दोन विकेट्स आणि एका षटकात साडेअकरा धावा. यावरून स्पष्ट होते की ट्रेंट बोल्टला रिलीज करायलाच हवे. साडेबारा कोटी ही खूप मोठी रक्कम आहे आणि या बदल्यात तुम्ही अनेक खेळाडू घेऊ शकता, ज्यामुळे अनेक खेळाडूंना रिलीज करण्याची गरजच पडणार नाही," असे ते म्हणाले.

हार्दिक पंड्याला ट्रेड करून बाहेर जाण्याच्या शक्यतेवर चोप्रांनी स्पष्ट केले की हा निर्णय रिटेन्शन किंवा रिलीज करण्याइतका सोपा नसेल. जर मुंबईला त्याच्या बदल्यात योग्य खेळाडू मिळाले नाहीत, तर त्यांना या अष्टपैलू खेळाडूला रिटेन करावेच लागेल. "हार्दिक पंड्याचा निर्णय ट्रेडवर अवलंबून असेल; तो रिलीज किंवा रिटेन करण्याचा प्रश्न नसेल. त्यामुळे जर त्याच्या बदल्यात तुम्हाला योग्य खेळाडू मिळत नसतील, तर तुम्हाला हार्दिक पंड्याला रिटेन करावेच लागेल. यात शंकाच नाही," असे ते पुढे म्हणाले.

संभाव्य बदलांची शक्यता

चोप्रा यांनी असेही सूचित केले की मुंबई इंडियन्स केशव महाराजला रिलीज करण्याचा विचार करू शकते. कारण संघाला मिचेल सँटनर आणि केशव महाराज या दोघांची गरज नसेल. "पण ट्रेंट बोल्टच्या बाबतीत मला कोणतीही शंका नाही; त्याला रिलीज केलेच पाहिजे. केशव महाराजला देखील सोडून देता येईल कारण त्यांना सँटनर आणि केशव दोघेही नको असतील. पण पुन्हा बघूया हार्दिक गेला तर त्याच्या जागी कोण येतंय," असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी, क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२७ च्या मिनी-ऑक्शनपूर्वी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या बदल्यात हार्दिकला पंजाब किंग्ज (PBKS) मध्ये ट्रेड करण्याच्या तयारीत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, सध्या ट्रेडची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि दोन्ही फ्रँचायझींनी आयपीएलकडे स्वारस्य पत्र (expression of interest) सादर केले आहे. पुढील टप्पा म्हणजे दोन्ही खेळाडूंकडून लेखी संमती मिळवणे, जी पुढील २४ तासांत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आयपीएलकडून या कराराला मंजुरी मिळण्यापूर्वी फ्रँचायझी अंतिम चर्चा करतील.

आयपीएल २०२६ च्या उत्तरार्धापासून हार्दिक आणि मुंबई इंडियन्समध्ये अनेक चर्चा झाल्या. त्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने स्वतःला रिलीज करण्याची इच्छा फ्रँचायझीला कळवली. मुंबईने त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) वगळता जवळपास सर्व फ्रँचायझींसोबत संभाव्य ट्रेड पर्यायांची पडताळणी केली. या प्रस्तावित ट्रेडमुळे मुंबई इंडियन्सला अर्शदीपमुळे त्यांच्या वेगवान गोलंदाजीची फळी मजबूत करता येईल आणि तो भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला साथ देईल. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मध्ये नवव्या स्थानावर होती आणि पुढील हंगामापूर्वी ते त्यांच्या वेगवान गोलंदाजी विभागात सुधारणा करण्याच्या शोधात असल्याचे समजते. हा प्रस्तावित ट्रेड पूर्ण झाल्यास, दोन्ही फ्रँचायझींसाठी हा एक मोठा बदल ठरेल. यामुळे मुंबईला नवीन कर्णधार मिळण्याची आणि वेगवान गोलंदाजी मजबूत होण्याची शक्यता आहे, तर पंजाब किंग्ज त्यांच्या संघात हार्दिकची अष्टपैलू क्षमता जोडू शकेल.