टीममेट्सने केलेल्या एका प्रँकमुळे सौरव गांगुली इतका वैतागला की त्याने कॅप्टन्सी सोडण्याचीच घोषणा केली होती. युवराज सिंग आणि टीमने मिळून, गांगुलीने खेळाडूंवर टीका केल्याची खोटी बातमी तयार केली होती.
चंदीगड : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन्सपैकी एक म्हणजे सौरव गांगुली. पण एकदा टीममेट्सनी केलेल्या 'एप्रिल फूल' प्रँकमुळे गांगुलीने थेट कॅप्टन्सी सोडण्याचीच तयारी केली होती. हा रंजक किस्सा भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने सांगितला आहे. ही घटना २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान घडली होती. हरभजनच्या म्हणण्यानुसार, एप्रिल फूलच्या दिवशी गांगुलीला फसवण्याचा हा प्लॅन युवराज सिंगच्या नेतृत्वात तयार झाला होता.
यासाठी खेळाडूंनी एका वृत्तपत्राची खोटी कात्रणं तयार केली होती, ज्यात गांगुलीने आपल्याच टीममेट्सवर जाहीर टीका केल्याचं छापलं होतं. या खोट्या बातमीनुसार, गांगुली मीडियाला म्हणाला होता की, 'युवराज सिंग एक पार्टी प्रेमी आहे', 'हरभजन सिंगला कशाचीच पर्वा नाही' आणि 'झहीर खान व आशिष नेहरा तर आपल्याच दुनियेत असतात'. ड्रेसिंग रूममध्ये संपूर्ण टीम एकत्र बसलेली असताना युवराजने हे वृत्तपत्र गांगुलीसमोर ठेवून त्याला जाब विचारला, असं हरभजनने सांगितलं.
गांगुलीने आपण असं काहीही बोललो नसल्याचं स्पष्ट केलं, पण खेळाडूंनी त्याला ती खोटी कात्रणं दाखवली. इतकंच नाही, तर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनीही युवराज आणि इतर खेळाडूंची बाजू घेतली. सचिनने गांगुलीला जाऊन म्हटलं, "दादा, तू हे केलेलं बरोबर नाही." द्रविडनेही त्याला दुजोरा दिला. हे पाहून गांगुलीचं टेन्शन आणखी वाढलं. त्याने देवाची शप्पथ घेऊन सांगितलं की मी असं काहीही केलेलं नाही आणि जर मी असं बोललो असेन, तर आत्ताच्या आत्ता कॅप्टन्सी सोडायला तयार आहे, अशी घोषणाच त्याने केली.
प्रकरण आणखी गंभीर करण्यासाठी काही खेळाडूंनी आपल्या किट बॅग उचलल्या आणि ड्रेसिंग रूममधून बाहेर जायला सुरुवात केली. हे पाहून गांगुली घाबरला आणि त्यांच्या मागे धावत म्हणाला, "अरे उद्या मॅच आहे, तुम्ही हे काय करत आहात?" अखेर हा विनोद हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर सचिन आणि टीमने हा एक 'एप्रिल फूल' प्रँक होता, हे उघड केलं. दादा आमच्यासाठी फक्त कॅप्टन नव्हता, तर मोठ्या भावासारखा होता, म्हणूनच आम्ही एवढा मोठा प्रँक करू शकलो. पण नंतर त्याला इतकं दुखावल्याबद्दल आम्हाला अपराधी वाटलं, असंही हरभजन सिंगने पुढे सांगितलं.


