वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २४९ धावांचा डोंगर उभा करूनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने संघाच्या खराब फिल्डिंगवर जोरदार टीका केली आहे. आगामी मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतील, तर फिल्डिंग सुधारण्याशिवाय पर्याय नाही, असा स्पष्ट इशारा त्याने दिला आहे.
रांची : मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतील, तर टीम इंडियाला आपली फिल्डिंग सुधारावीच लागेल, असा कडक इशारा माजी विकेटकीपर दिनेश कार्तिकने दिला आहे. सध्या संघ सामने जिंकत असला तरी फिल्डिंगमध्ये खूप चुका होत आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले. २०२७ चा वनडे वर्ल्ड कप आता जवळ आला आहे. छोट्या चुकांचाही मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी भारताकडे जास्त वेळ नाही, असं डीके म्हणाला.
रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर क्रिकबझशी बोलताना कार्तिकने संघाच्या फिल्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजू सॅमसनच्या (४१ चेंडूत ८२ धावा) तुफानी खेळीच्या जोरावर भारताने २४९/५ असा धावांचा डोंगर उभा केला होता. पण, वेस्ट इंडिजने ९ चेंडू राखून हे टार्गेट पूर्ण केलं. शाई होप (४५ चेंडूत नाबाद १०२) आणि शेरफेन रदरफोर्ड (३७ चेंडूत ८४) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे पाच सामन्यांची ही मालिका आता १-१ अशी बरोबरीत आली आहे.
दिनेश कार्तिकचा कडक इशारा -
"२४९ धावा करूनही जर सामना कठीण वाटत असेल, तर आपण नक्कीच आपल्या चुका शोधल्या पाहिजेत. गेल्या काही काळापासून फिल्डिंग ही आपली सर्वात मोठी समस्या बनली आहे. आपण वनडे सिरीज आणि एशियन गेम्स जिंकलो, फक्त म्हणूनच या चुका कोणाच्या लक्षात आल्या नाहीत. एशियन गेम्सच्या फायनलमध्येही आपली फिल्डिंग खूपच खराब होती. इंग्लंड आणि आयर्लंडमध्येही तीच परिस्थिती होती. त्यामुळे हा एक अत्यंत गंभीर विषय आहे," असा इशारा कार्तिकने दिला.
"जुन्या फिल्डिंग कोचला डच्चू देण्यामागचं कारण हेच असू शकतं की, ते संघाला पुढच्या लेव्हलवर नेऊ शकले नाहीत. आता नवीन फिल्डिंग कोच शुभदीप घोष यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. टीम इंडियाची फिल्डिंग आधीपेक्षा चांगली कशी होईल, हे पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे. यात ते अपयशी ठरले, तर त्यांनाही टीकेला सामोरं जावं लागेल," असंही तो म्हणाला.
इतर विभागांमध्ये संघ चांगली कामगिरी करत असला तरी, फिल्डिंगमधील घसरण आता दुर्लक्षित करून चालणार नाही, असं दिनेश कार्तिकला वाटतं. "गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाचा फिल्डिंगचा दर्जा नक्कीच घसरला आहे. मोठ्या स्पर्धा जिंकण्यासाठी फिल्डिंग खूप महत्त्वाची असते. त्यामुळे संघाला आपला दर्जा वाढवावाच लागेल," असं त्याने स्पष्ट केलं.
दुसरा सर्वात मोठा रन चेस
विंडीज संघाने २५० धावांचं टार्गेट यशस्वीपणे पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हा दुसरा सर्वात मोठा रन चेस आहे. २०२३ मध्ये विंडीजविरुद्धच दक्षिण आफ्रिकेने २५९ धावांचं टार्गेट पूर्ण केलं होतं, जो आजही एक विक्रम आहे.

