U-19 World Cup 2026 : आगामी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा झाली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा वैभव सूर्यवंशी या संघाचा प्रमुख चेहरा आहे.
नवी दिल्ली : आगामी १९ वर्षांखालील (U-19) विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चा आहे ती केवळ वैभव सूर्यवंशीची. आयपीएलच्या लिलावात इतिहास रचल्यानंतर आता वैभव जागतिक स्तरावर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. या महत्त्वाकांक्षी संघाचे कर्णधारपद स्टार खेळाडू आयुष म्हात्रे याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
वैभव सूर्यवंशीची निवड का ठरली खास?
गेल्या वर्षभरापासून वैभवने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने झळकावलेली १९० धावांची तुफानी खेळी त्याच्या निवडीसाठी निर्णायक ठरली. आयपीएलमध्ये चमकल्यानंतर आता भारताला सहावे विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी वैभव सज्ज झाला आहे.
विश्वचषकाचे समीकरण आणि भारताचे वेळापत्रक
झिम्बाब्वेमधील हरारे येथे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ संघ भिडणार आहेत. भारताचा समावेश 'गट ब' मध्ये असून न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश यांसारख्या तगड्या संघांशी टीम इंडियाचा सामना होईल.
१५ जानेवारी: भारत विरुद्ध अमेरिका (बुलावायो)
१७ जानेवारी: भारत विरुद्ध बांगलादेश (बुलावायो)
२४ जानेवारी: भारत विरुद्ध न्यूझीलंड (बुलावायो)
उपांत्य फेरी आणि अंतिम सामना हरारे येथे खेळवला जाणार असून भारताची नजर विजेतेपदाच्या 'सिक्सर'वर असेल.
विश्वचषक २०२६ साठी 'यंग इंडिया'चा संघ
कर्णधार: आयुष म्हात्रे
उपकर्णधार: विहान मल्होत्रा
फलंदाज: वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, आर.एस. अंबरीश, खिलान ए. पटेल.
यष्टीरक्षक: हरवंश सिंग, अभिज्ञान कुंडू.
अष्टपैलू व गोलंदाज: कनिष्क चौहान, मोहम्मद एनां, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.
आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्याची संधी
नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर हा पराभव विसरून नवीन इतिहास रचण्याचे आव्हान या तरुण ब्रिगेडसमोर असेल.


