Ben Stokes Angry Statement After Ashes Loss : ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा पारा चढला आहे.  

Ben Stokes Angry Statement After Ashes Loss : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲशेस मालिका 2025-26 च्या दुसऱ्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा राग अनावर झाला आहे. त्याने आपल्या खेळाडूंना खडे बोल सुनावत त्यांना सत्याचा आरसा दाखवला आहे. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूंनी 8 विकेट्सने विजय मिळवला. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पर्थमधील पहिल्या कसोटीतही इंग्लंडच्या संघाला 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.

पराभवानंतर बेन स्टोक्सचा संताप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांतील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या संघाला फटकारले आहे. त्याने एक धक्कादायक विधान केले आहे, जे ऐकून संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. सामना संपल्यानंतर त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, ऑस्ट्रेलियात आणि ड्रेसिंग रूममध्ये कमकुवत दिसणाऱ्या खेळाडूंना जागा नाही.

पराभव टाळण्यासाठी बेनने लावली पूर्ण ताकद

गाबामध्ये झालेल्या पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, काही काळ त्याच्या संघाने पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. त्याने 152 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. त्याने विल जॅक्ससोबत 220 चेंडूंचा सामना करत 96 धावांची भागीदारी केली. याच भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 65 धावांचे लक्ष्य ठेवले. तथापि, कांगारूंसाठी हे लक्ष्य फारसे अवघड नव्हते.

बेन स्टोक्स ऑस्ट्रेलियाबद्दल काय म्हणाला?

एक म्हण आहे जी आम्ही यापूर्वीही अनेकदा येथे येऊन बोललो आहोत की, ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत लोकांसाठी नाही. मी ज्या ड्रेसिंग रूमचा कर्णधार आहे, तिथेही कमकुवत लोकांना जागा नाही. हे खूप निराशाजनक आहे. माझ्यासाठी याचे एक मोठे कारण म्हणजे या खेळाचा, या फॉरमॅटच्या दबावाचा सामना करणे, जेव्हा सामना पणाला लागलेला असतो.

छोट्या-छोट्या संधींवर आम्ही काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आणि नंतर ते हातातून जाऊ दिले. या आठवड्यातही आम्ही तेच केले. हे खूप निराशाजनक आहे, विशेषतः आमच्या ड्रेसिंग रूममधील खेळाडूंची क्षमता पाहता. आम्हाला त्या क्षणांबद्दल थोडे अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे आणि आम्ही मानसिकदृष्ट्या त्यातून काय घेत आहोत याचाही विचार करायला हवा. एकूणच, गरज पडल्यास थोडा अधिक संघर्ष करावा लागेल.