भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक, मुंबई आणि गुजरात संघाचे प्रशिक्षक तसेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून रमेश पोवार यांनी काम पाहिले आहे.

मुंबई : बीसीसीआयने (BCCI) माजी भारतीय फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या निवड समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) बीसीसीआय मुख्यालयात उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर रमेश पोवार यांच्या नावाची एकमताने शिफारस करण्यात आली. भारतासाठी २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेल्या पोवार यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा मोठा अनुभव आहे.

रमेश पोवार यांनी यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय मुंबई आणि गुजरात संघाचे प्रशिक्षक, तसेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने आशिया चषक जिंकला होता आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. पोवार यांच्या निवड समितीत येण्याने, आता ज्येष्ठतेच्या आधारावर (सर्वाधिक कसोटी सामने खेळल्याचा अनुभव) माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा निवड समितीचे नवे चेअरमन बनणार आहेत.

पुरुष निवड समितीचे चेअरमन अजित आगरकर यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यांच्या योगदानाबद्दल बीसीसीआयने त्यांचे आभार मानले. जुलै २०२३ मध्ये आगरकर यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया चषक आणि सलग दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली. आता पाच सदस्यीय निवड समितीत प्रज्ञान ओझा (चेअरपर्सन), शिवसुंदर दास, आर.पी. सिंग, अजय रात्रा आणि रमेश पोवार यांचा समावेश आहे. माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर यांनीही निवड समितीसाठी अर्ज केला होता.

जर वसीम जाफर यांची निवड समितीत वर्णी लागली असती, तर ज्येष्ठतेनुसार त्यांना चेअरमन करावे लागले असते. मात्र, बीसीसीआयच्या पसंतीनुसार प्रज्ञान ओझा यांना चेअरमनपद देण्यात आले. आगरकर यांनी पद सोडल्यानंतर, ओझा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीनेच भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली होती.