ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रवासादरम्यान एक सुखद अनुभव आला. त्यांना क्रिकेटचे दिग्गज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग अनपेक्षितपणे भेटले. या भेटीनंतर त्यांनी दोघांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची आणि खेळाच्या शैलीची प्रशंसा केली.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासाठी एक भारी योगायोग जुळून आला. प्रवासादरम्यान त्यांची भेट भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी झाली. हा आनंदाचा क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खेर यांनी फोटो शेअर करत लिहिले, "कधीकधी प्रवासातील मजा ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात नसते, तर वाटेत अनपेक्षितपणे भेटणाऱ्या माणसांमध्ये असते. काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर राहुल द्रविड भेटला. आज विमानात वीरेंद्र सेहवागला भेटण्याचा योग आला."
क्रिकेटच्या दिग्गजांबद्दल व्यक्त केला आदर
खेर यांनी द्रविड आणि सेहवाग यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचं कौतुक केलं. ते पुढे म्हणाले, "दोघेही पूर्णपणे वेगळ्या स्वभावाचे. खेळण्याची शैलीही एकदम वेगळी. तरीही दोघांनी भारताला अभिमान आणि आनंदाचे असंख्य क्षण दिले. राहुलने त्याच्या शांत स्वभावाने, शिस्तीने आणि अविचल निष्ठेने आपल्याला प्रेरणा दिली. तर वीरूने त्याच्या निडर वृत्तीने, सहज उत्कृष्ट खेळाने आणि मनमोहक हास्याने आपल्याला थ्रिल अनुभवायला दिलं. जे लोक सहजपणे उत्कृष्टता दाखवतात, त्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं. राहुल आणि वीरू या दोघांनीही आपापल्या खास शैलीत हे करून दाखवलं आहे."
या आठवणी, प्रेरणा आणि 'महानता ही फक्त प्रतिभेत नसते, तर चारित्र्यातही असते' याची आठवण करून दिल्याबद्दल खेर यांनी या दोन्ही क्रिकेटपटूंचे आभार मानले.
आगामी चित्रपट
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अनुपम खेर यांनी नुकतंच सूरज बडजात्या दिग्दर्शित 'यह प्रेम मोल लिया' या त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली. राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स निर्मित या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट दिवाळीनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय, त्यांचा बहुप्रतिक्षित 'खोसला का घोसला'चा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कॉमेडी चित्रपट २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होईल. या सिक्वेलमध्ये मूळ चित्रपटातील खोसला कुटुंबाची भूमिका साकारणारे रणवीर शौरी, किरण जुनेजा आणि परविन दबस पुन्हा एकदा दिसणार आहेत. २००६ च्या चित्रपटाचा भाग असलेली तारा शर्मा देखील या सिक्वेलमध्ये सामील झाली आहे. (एएनआय)
