India vs Pakistan U19 Asia Cup: अंडर १९ आशिया कपच्या महामुकाबल्यात पाकिस्तानने भारताला ३ विकेट्सनी धूळ चारली. पाकिस्तानच्या हमजा जहूरने शानदार शतक ठोकत भारताचा विजय हिरावून घेतला.
India vs Pakistan U19 Asia Cup: छोट्यांच्या आशिया कपच्या महामुकाबल्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. अंडर १९ इमर्जिंग आशिया कपच्या ग्रुप मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला ३ विकेट्सनी हरवलं. सातव्या नंबरवर बॅटिंगला येत हमजा जहूरने शानदार शतक झळकावलं आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. ओमानमध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने ७ विकेट्स गमावून २०९ रन्सचं टार्गेट ११ बॉल शिल्लक ठेवून पूर्ण केलं. ५० ओव्हर्सच्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करत टीम इंडिया २०७ रन्सवर ऑल आऊट झाली होती.
दोन शतकं- अर्जुन हिरो, पण हमजाने मारली बाजी
२०९ रन्सचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था वाईट होती. फक्त ६१ रन्समध्ये त्यांचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण, १९ वर्षांचा विकेटकीपर-बॅटर हमजाने एक अविश्वसनीय इनिंग खेळली. त्याने भारताच्या अर्जुन राजपूतने ८५ बॉलमध्ये काढलेल्या १०७ रन्सच्या शानदार खेळीवर पाणी फेरलं.
व्हिडिओ पहा
पाकिस्तानने मॅच कशी जिंकली
हमजाने १०८ बॉलमध्ये १०० रन्सची इनिंग खेळली, ज्यात १० चौकार आणि ३ षटकार होते. हमजा सोडून पाकिस्तानचे फक्त दोनच बॅटर दुहेरी आकडा गाठू शकले - हसनैन अब्बास दार (३८) आणि अब्दुल कादीर. भारताच्या बॉलर्सनी पाकिस्तानच्या टॉप आणि मिडल ऑर्डरला लवकर आऊट केलं, पण अनुभवाच्या अभावी ते मॅच जिंकू शकले नाहीत. भारताचा लेफ्ट आर्म स्पिनर मानल चौहानने ३२ रन्स देऊन ३ विकेट्स घेतल्या. तर मोहित उलवाने २ विकेट्स काढल्या.
इतरांच्या अपयशात अर्जुनची चमक
पहिली बॅटिंग करताना भारतीय अंडर १९ टीमची कामगिरी खूपच निराशाजनक होती. कॅप्टन लक्ष्य रायचंदानी शून्यावर आऊट झाला. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग (४० बॉलमध्ये २२ रन्स) चांगली सुरुवात करून आऊट झाला. ६ नंबरवर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड (१६ बॉलमध्ये १० रन्स) काहीच करू शकला नाही. ८६ रन्समध्ये ५ विकेट्स गेल्याने भारताची स्थिती खूपच बिकट झाली होती. या परिस्थितीत पंजाबच्या अर्जुन राजपूतने अप्रतिम इनिंग खेळली. त्याने फक्त ८५ बॉलमध्ये १०७ रन्सची शानदार खेळी केली. यात त्याने ५ षटकार आणि ११ चौकार मारले. शेवटच्या ओव्हर्समध्ये काव्य प्रसाद पटेलने २३ रन्सची महत्त्वाची खेळी करत टीमला २०० पार पोहोचवलं. तरीही भारताला ही मॅच जिंकता आली नाही.
हारलो तरी सेमीफायनलचा मार्ग मोकळा
आजची मॅच हारली असली तरी भारतालाCR सेमीफायनलला पोहोचायला काही प्रॉब्लेम येणार नाही. मंगळवारी युएई (UAE) अंडर १९ टीमला हरवलं की भारत सेमीफायनलला पोहोचेल. पहिल्या मॅचमध्ये भारताने नेपाळला १० विकेट्सनी हरवलं होतं. तर पाकिस्तानने युएईचा पराभव केला होता. आठ टीमच्या इमर्जिंग आशिया कपच्या ग्रुप 'ए'मध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि युएई आहेत. तर ग्रुप 'बी'मध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि मलेशियाचा समावेश आहे.












