मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. सरकारने वंशावळ समिती स्थापन केली असून तिचा कार्यकाळ वाढवला आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असून आंदोलक प्रतिकूल परिस्थितीतही ठाम आहेत.

मुंबई: मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. सरकारच्या वतीने तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीला दिली मुदतवाढ 

या समितीला सरकारच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काढण्याची आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंशावळ समितीची स्थापना ही २५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आली होती. या समितीचा कार्यकाळ आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे. आझाद मैदानावर मराठे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. या ठिकाणी सरकारने शौचालये बंद केले असून खाऊगल्ली बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं मराठा आंदोलकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु झाले आहेत. तरीही प्रतिकूल परिस्थितीत आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलक भर पावसात बसून राहिले आहेत.