उद्या २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. भिवंडीतील भागात पेपर फुटल्याचं समजल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा TET या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटीच्या घटनेनंतर उद्या २८ जून रोजी होणारी टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबईतील भिवंडी परिसरातून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर येत आहेत. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेनंतर उद्या राज्यभरातील ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आली असल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभर २८ जून रोजी रविवारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET होणार होती. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधीच शनिवारी २७ जून रोजी टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच पार्श्वभूमीवर उद्या रविवारी २८ जून रोजी होणारी राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीनंतर पुढे ढकलण्यात आल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती उपलब्ध असल्याचं समोर आलं. त्यानंतर, भिवंडी पोलिसांकडून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या तपासात त्या व्यक्तींकडे असलेल्या प्रश्नपत्रिकेत प्रत्यक्ष परीक्षेतील काही प्रश्न आढळून आले. भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर आता २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी या शिक्षक पात्रता परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून कठोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी पेपर देताना विद्यार्थ्यांना बूट घालण्यासाठी मनाई केली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी येताना चप्पल, सँडल घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर विद्यार्थ्यांची ओळख पडताळणी, हजेरी, झडती घेतली जाणार होती. परीक्षा केंद्रावर जवळपास दीड तास आधी उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या. याबाबतची माहिती टीईटी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली होती. मात्र आता परीक्षेच्या अगदी तोंडावर पेपरफुटीच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे.