खरंच बायकोच्या नावावर घर घ्यावे का? काय आहेत फायदे? किती पैसे वाचतील?
बायकोच्या नावावर घर घेतल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, गृहकर्जाच्या व्याज दरात सवलत, आयकर सवलती आणि सरकारी योजनांचे फायदे मिळून लाखो रुपये वाचवता येतात. यामुळे महिलांचे मालकी हक्क वाढतात.

वाचवा! नक्कीच वाचवा!
घर खरेदी करणे हे प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण, कोणाच्या नावावर घर घ्यायचे हा आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या मोठा परिणाम करणारा मुद्दा आहे. अलीकडील सरकारी घोषणा आणि बँकांच्या सवलती पाहता, बायकोच्या नावावर घर घेतल्याने कुटुंबाला लाखो रुपये वाचवता येतात.
स्टॅम्प ड्युटीत सूट - लाखोची बचत
महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये १% सूट मिळते. सामान्यतः ७% असलेली स्टॅम्प ड्युटी महिलांच्या नावावर नोंदणी केल्यास ६% होते. एक कोटी रुपयांचे घर घेतल्यास, थेट १ लाख रुपये वाचतात. दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा यासारख्या अनेक राज्यांमध्ये महिलांसाठी कमी स्टॅम्प ड्युटी आहे. त्यामुळे घर नोंदणी खर्चात मोठी बचत होते.
गृहकर्जावर व्याज सवलत
- बँका महिलांना विशेष व्याज सवलत देतात.
- इंडियन बँक, अॅक्सिस बँक, एसबीआयसारख्या बँकांमध्ये महिलांसाठी गृहकर्जाचा व्याजदर ०.०५% - ०.१% ने कमी असतो.
- उदाहरणार्थ, ५० लाखांच्या कर्जावर २० वर्षे परतफेड केल्यास, या छोट्या व्याजदरातील कपात सुमारे १.५ लाख ते २ लाख रुपये वाचवण्यास मदत करते.
आयकरात अतिरिक्त फायदा
- जर बायकोच्या नावावर मालमत्ता खरेदी केली असेल आणि पती सह-मालक असेल, तर आयकर कायद्याच्या कलम ८०C आणि २४(b) अंतर्गत दोही जण मिळून सवलत मिळवू शकतात.
- वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत मूळ रकमेवर सूट.
- गृहकर्जाच्या व्याजावर वार्षिक २ लाख रुपयांपर्यंत सूट.
- घर भाड्याने दिल्यास, दिलेले संपूर्ण व्याज वजा केले जाते. यामुळे, आयकरात लाखो रुपयांचा फायदा होतो.
सरकारी योजनांमध्ये अतिरिक्त सवलती
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत, महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास, सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळते. लहान आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा मोठा आधार आहे. तसेच, महिलांच्या नावावर घर असल्यास, काही राज्यांमध्ये भविष्यात मालमत्ता कर किंवा देखभाल शुल्कात अतिरिक्त सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कायदेशीर, कौटुंबिक फायदे
महिलांच्या नावावर घर असल्याने कुटुंबाचे संरक्षण वाढते. पतीला अनपेक्षित आर्थिक अडचणी आल्या तरी, बायकोच्या नावावरील मालमत्ता कायदेशीररित्या तिचीच राहते. हे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासोबतच कुटुंबाच्या कल्याणासाठीही मदत करते.
लक्षात ठेवायच्या काही गोष्टी
- जर बायकोला स्वतःचे उत्पन्न नसेल, तर त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पतीच्या नावावर कर आकारला जाईल.
- काही वेळा सह-मालक म्हणून पतीचे नाव जोडल्यास, बँक कर्ज सहज मिळते.
- महिलांच्या नावावर घर घेतल्यास, भविष्यात विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे, वारसाहक्क इत्यादींचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
बायकोच्या नावावर घर घेतल्याने आर्थिक आणि कायदेशीरदृष्ट्या अनेक फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटी सूट, व्याज सवलत, आयकर सवलत, सरकारी योजनांचे फायदे अशा विविध मार्गांनी लाखो रुपयांची बचत होते. त्याच वेळी, महिलांचे मालकी हक्क वाढतात आणि कुटुंबाचे संरक्षणही मजबूत होते. त्यामुळे, पुढच्या वेळी घर घेण्याचा विचार केल्यास, बायकोच्या नावावर नोंदणी करणे हा एक शहाणा निर्णय असेल.

