- Home
- Mumbai
- Mumbai Weather : मुंबईत उकाड्याचा कहर! दमट हवामानाने नागरिक हैराण, पावसाच्या सरी कधी बरसणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज
Mumbai Weather : मुंबईत उकाड्याचा कहर! दमट हवामानाने नागरिक हैराण, पावसाच्या सरी कधी बरसणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : हवामान विभागाने मुंबईत हलक्या पावसाचा इशारा दिला होता. पण प्रत्यक्षात पावसाने आजही मुंबईला दांडी मारली. गेले काही दिवस सतत वाढलेल्या आर्द्रतेमुळे वातावरण अधिकच दमट आणि अस्वस्थ झालं आहे.

मुंबईकर उकाड्याने हैराण, पावसाची दडी
मुंबईकरांनी काल (05 ऑगस्ट) पूर्ण दिवस दमट हवामानाचा जबरदस्त तडाखा सहन केला. सकाळपासूनच वातावरणात असह्य उकाडा जाणवत होता. दुपारी आर्द्रता ७६ टक्क्यांपर्यंत, संध्याकाळी ती वाढून ७९ टक्क्यांवर, तर रात्री ९० टक्क्यांच्या घरात पोहोचल्याची नोंद हवामान विभागाने केली.
मुंबईतील हवामान
हवामान खात्याने हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र प्रत्यक्षात पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली. मागील काही दिवसांपासून आर्द्रतेचा स्तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, यामुळे वातावरण अधिकच दमट आणि अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
हवामानाच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
या दमट हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतो आहे. उकाडा, घाम, थकवा आणि निर्जलीकरण यांसारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि बाहेर काम करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता
कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यासोबत आकाश ढगाळच राहील आणि दमटतेत फारसा दिलासा मिळणार नाही. हवामान अंदाजानुसार, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
मुंबईतील जलाशयांची स्थिती
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठा वाढला आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा ८९.२६ टक्के आहे. सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी, हे प्रमाण १२,९१,८७७ दशलक्ष लिटर इतकं आहे.

