Mumbai Water Cut : बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या कामामुळे 8 आणि 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील 14 प्रशासकीय विभागांमध्ये 24 तासांसाठी 15% पाणी कपात केली जाईल.
मुंबई : मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे काम पुन्हा हाती घेत नवीन तारीख जाहीर केली आहे.
कामाची नवी डेडलाईन जाहीर
3 आणि 4 डिसेंबर रोजी नियोजित असलेले जलवाहिनी बदलण्याचे काम रद्द झाल्यानंतर, याच कामासाठी 8 आणि 9 डिसेंबर 2025 या नव्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे महत्त्वाचे काम या दोन दिवशी करण्यात येणार आहे.
कधी असेल पाणी कपात?
सुरुवात: सोमवार, 8 डिसेंबर 2025 – सकाळी 10:00
समाप्ती: मंगळवार, 9 डिसेंबर 2025 – सकाळी 10:00
कपात प्रमाण: अंदाजे 15% पाणीपुरवठा घट
कालावधी: जवळपास 24 तास
ही जलवाहिनी काढून नवीन लाईन बसवण्याचे काही महत्त्वाचे तांत्रिक काम असल्याने, या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला येणाऱ्या पाण्यात सुमारे 15% घट होणार आहे.
कोणत्या 14 विभागांवर परिणाम?
या कामाचा थेट परिणाम मुंबईतील 14 प्रशासकीय विभागांवर होणार आहे.
मुंबई शहर विभागातील क्षेत्रे:
ए विभाग
सी विभाग
डी विभाग
जी दक्षिण
जी उत्तर
पश्चिम उपनगरातील क्षेत्रे:
एच पूर्व
एच पश्चिम
के पश्चिम
पी दक्षिण
पी उत्तर
आर दक्षिण
आर मध्य
पूर्व उपनगरातील क्षेत्रे:
एल विभाग
एस विभाग
या सर्व भागांमध्ये निर्दिष्ट कालावधीत 15% पाणी कपात लागू राहील.
नागरिकांना महापालिकेचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व प्रभावित विभागांतील नागरिकांना आधीच पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन केले आहे. तसेच, 8 आणि 9 डिसेंबर या कालावधीत पाणी जपून वापरण्याची विनंतीही करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.


