मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 शैक्षणिक वर्षापासून परीक्षांसाठी नवे नियम लागू केले आहेत. हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी APAAR ID अनिवार्य करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या परीक्षांसाठी नवे नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी अपार आयडी (APAAR ID) देणे अनिवार्य असणार आहे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी हे दोन्ही नियम लक्षात घेणे आवश्यक आहे.
हॉलतिकिटासाठी अपार आयडी आवश्यक
अपार म्हणजे Automated Permanent Academic Account Registry असा त्याचा अर्थ आहे. हा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला 12 अंकी डिजिटल शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने सेव्ह आणि लिंक केले जातात. मुंबई विद्यापीठाने वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडीची माहिती देणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती सादर न केल्यास त्यांना हॉलतिकीट मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.
आधार आयडीसाठी विशेष सुविधा शिबिर
आधार आयडीतयार करताना, ABC ID लिंक करताना किंवा आधार व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने विशेष आधार सुविधा शिबिराचे आयोजन केले आहे. विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकानुसार हे शिबिर 19 आणि 20 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेले नाही किंवा तांत्रिक समस्या येत आहेत, त्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिबिराला जाताना आधार कार्ड आणि आवश्यक संबंधित कागदपत्रे सोबत घेऊन जाण्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
परीक्षेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे लागणार
मुंबई विद्यापीठाच्या नव्या परीक्षा निर्देशानुसार, वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होणार असेल, तर त्याला सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक असेल.
वेळेआधी पोहोचण्याचे कारण काय?
परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ओळख पडताळणी, बसण्याची जागा आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये आणि संस्थांच्या प्राचार्य, संचालक तसेच विभागप्रमुखांना हा नियम विद्यार्थी, शिक्षकांसह परीक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन
नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर शेवटच्या क्षणी पोहोचणे टाळावे लागणार आहे. प्रवासासाठी पुरेसा वेळ राखून परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याची वेळ, परीक्षा केंद्र आणि हॉलतिकिटासोबत अपार आयडीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया आधीच पूर्ण करून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.


