Shweta Tiwari Cockroach Delivered With Cold Drinks : अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कोल्डड्रिंक ऑर्डर केलं होतं. त्या डिलिव्हरीसोबत तिला झुरळ आलं असल्याचं सांगत तिने याबाबत तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली आहे.

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे मदत मागितली आहे.

श्वेता तिवारीने एक व्हिडिओ शेअर करत तो तुकाराम मुंढे यांना टॅग केला आहे. घरी कोल्डड्रिंकची डिलिव्हरी तिने मागवली होती. पण त्यासोबत झुरळ आढळल्याचं तिने सांगितलं आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलंय, आम्ही इन्स्टामार्टवरुन रेल बुल ऑर्डर केलं होतं. डिलिव्हरीसोबत झुरळंही आलं. हे झुरळ घरात सगळीकडे फिरतंय. तिने पुढे लिहिलंय, मुंढेजी आमच्या घरात डिलिव्हरीसोबत झुरळही आलं. कृपया याकडे लक्ष द्या.

तुकाराम मुंढे यांना टॅक करण्याशिवाय तिने क्विक कॉमर्स ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मलाही तिने झुरळ आढळल्याचा व्हिडिओ टॅग करत माहिती दिली आहे. तिच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर तुकाराम मुंढे किंवा डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नियम व अटींचं उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्स, कॅन्टीन्स, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई केल्यामुळे अनेकांनी त्यांना 'खरे सिंघम' असं म्हटलं आहे. भेसळयुक्त पदार्थ, अस्वच्छता, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रभरात बेधडक कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या श्वेता तिवारी 'द ट्रेटर्स २' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या नव्या सिझनमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे. या शोमध्ये क्रिस्टल डिसूझा, मल्लिका शेरावत, मुनव्वर फारुकी, पारुल गुलाटी, रणवीर ब्रार, रिया चक्रवर्ती, हरमन सिंघा, तान्या पुरी यासह इतरही अनेक कलाकार आहेत. करण जोहर या शोचं सूत्रसंचालन करत आहे. हा 'द ट्रेटर्स २' शो प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांना पाहता येईल.