मुंबईत एका स्कूटीस्वाराने राँग साईडने गाडी चालवत एका महिलेची कार अडवली आणि तिला शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच एका स्कूटीस्वाराने राँग साईडने येऊन एका महिलेची कार अडवली आणि तिला भयंकर शिवीगाळ केली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मोनल झवेरी या मुंबईत राहणाऱ्या महिलेने एक्स (X) वर या घटनेची माहिती दिली. पाटकर मार्ग आणि गावदेवी रोडच्या जंक्शनवर हा प्रकार घडला. मोनल यांच्या म्हणण्यानुसार, हा माणूस राँग साईडने स्कूटी चालवत आला आणि त्याने थेट त्यांच्या कारसमोर गाडी उभी करून रस्ता अडवला.
यानंतर या स्कूटीस्वाराने मोनल यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. मोनल यांनी या घटनेचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात तो माणूस कारच्या बाजूला उभा राहून हिंदीतून अश्लील शिव्या देताना स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओच्या शेवटी तो माणूस पुन्हा आपल्या स्कूटीवर बसतो आणि राँग साईडनेच तिथून निघून जातो, हेही पाहायला मिळतं.
वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जात असल्याचं आणि जाब विचारल्यावर अशी दादागिरी केली जात असल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मोनल यांच्या पोस्टची मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी ही तक्रार संबंधित ट्रॅफिक विभागाकडे पाठवली.
मोनल झवेरी यांच्या पोस्टला उत्तर देताना मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितलं की, "ताडदेव ट्रॅफिक डिव्हिजनला याबद्दल माहिती देण्यात आली आहे."


