मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्याची १ कोटी रुपयांची मर्सिडीज एसयूव्ही गेल्या तीन महिन्यांपासून ठाण्यातील गॅरेजमध्ये उभी आहे. उंदरांनी कारची वायरिंग खराब केल्याने हे नुकसान झालं असून, कार नसतानाही मालक दरमहा २.५ लाख रुपयांचा ईएमआय भरत आहेत.
मुंबईतील एका डॉक्टर दाम्पत्यासमोर एक विचित्र समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्या आलिशान मर्सिडीज-बेंझ इलेक्ट्रिक एसयूव्हीची वायरिंग उंदरांनी कुडतडली असून, गेल्या तीन महिन्यांपासून ही गाडी ठाण्यातील सर्व्हिस सेंटरमध्ये धूळ खात पडून आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. अमित कारखानीस आणि त्यांच्या पत्नी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनघा कारखानीस यांनी जुलै २०२४ मध्ये मर्सिडीज-बेंझ EQE 500 4MATIC ही गाडी खरेदी केली होती. या गाडीची किंमत अंदाजे १ कोटी रुपये आहे.
२७ ऑगस्ट रोजी उंदरांनी गाडीचं नुकसान केल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी ठाण्यातील लँडमार्क कार्सच्या वर्कशॉपमध्ये नेली. तिथूनच त्यांच्या त्रासाला सुरुवात झाली. त्यांच्या विमा कंपनीने दुरुस्तीसाठी तत्काळ मंजुरी दिली असली तरी, गाडीची विशिष्ट वायरिंग हार्नेस जर्मनीहून आणावी लागणार असल्याने गाडी अद्याप वर्कशॉपमध्येच आहे.
हा नवा पार्ट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दाम्पत्याला अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे.
कार नसतानाही दाम्पत्य भरतंय २.५ लाखांचा ईएमआय
गाडीच्या दुरुस्तीस होत असलेल्या विलंबामुळे या दाम्पत्यावर आर्थिक आणि व्यावहारिक ताण आला आहे. गाडी वापरता येत नसतानाही ते दरमहा सुमारे २.५ लाख रुपयांचा ईएमआय भरत आहेत.
या परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे. सध्या त्यांच्या अंधेरीतील घराचं नूतनीकरण सुरू असल्याने ते ठाण्यात राहत आहेत. दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या कामासाठी दररोज वांद्रे येथे जावं लागतं.
पर्यायी गाडी न मिळाल्याने आणि दुरुस्ती कधी पूर्ण होईल हे निश्चित नसल्याने डॉ. अमित कारखानीस यांनी निराशा व्यक्त केली. मर्सिडीज उपलब्ध नसल्यामुळे एका वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी कॅब बुक करावी लागल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला.
गाडी वर्कशॉपमध्ये पडून असली तरी तिची वॉरंटी आणि विमा कव्हरेज सुरूच असल्याबद्दलही मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मर्सिडीज डीलरशिपचं स्पष्टीकरण, जर्मनीहून मागवला नवा पार्ट
या तक्रारींवर लँडमार्क कार्सच्या कस्टमर एक्स्पिरियन्सच्या जनरल मॅनेजर शेफाली शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी उंदरांनी गाडीच्या वायरिंग हार्नेसचं नुकसान केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
शिंदे यांनी सांगितलं की, आवश्यक असलेला नवा पार्ट जर्मनीहून मागवण्यात आला असून, तो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात येण्याची अपेक्षा आहे. डीलरशिपद्वारे ग्राहकाला ही माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पर्यायी गाडीच्या मागणीबाबत बोलताना शिंदे म्हणाल्या की, अशा सुविधा साधारणपणे वॉरंटीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्या जातात. पण हे प्रकरण अपघातग्रस्त नुकसान प्रकारात हाताळलं जात आहे. सणासुदीच्या काळात डीलरशिपच्या सर्व पर्यायी गाड्या दुसऱ्या ग्राहकांकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या घटनेमुळे भारतात आयात केलेल्या आलिशान इलेक्ट्रिक गाड्यांच्या दुरुस्तीतील आव्हानांवरही प्रकाश पडला आहे. मर्सिडीज EQE 500 ही गाडी पूर्णपणे बांधून तयार (Completely Built Unit - CBU) म्हणून आयात केली जात असल्याने, तिचे काही विशेष पार्ट परदेशातून मागवावे लागतात. यामुळे दुरुस्तीसाठी लागणारा वेळ वाढू शकतो.












