सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी, ‘बेस्ट’ बसच्या २३ मार्गांत बदल

| Published : Jul 03 2024, 12:46 PM IST

sion bridge

सार

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे.

 

मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील ११० वर्षे जुना पूल पाडून त्याची पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. यासाठी या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ‘बेस्ट’ने बसच्या २३ मार्गांमध्ये बदल केला आहे. पुढील १८ महिने पुलाचे काम सुरू राहणार आहे. अंधेरी येथील गोखले पूल पडल्याने मुंबईतील ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांची तपासणी भारतीय प्रौद्योगिकी संस्थांद्वारे (आयआयटी) करण्यात आली. त्यात ११२ वर्षे जुना सायन रेल्वे स्थानकावरील पूल जीर्ण अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सद्य:स्थितीतील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१) सायन स्थानकावरील पूल पाडून त्या जागी आरसीसी स्लॅबसह नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातल्याने चेंबूर मार्गे येणाऱ्या बस बीकेसी, तर दक्षिण मुंबईतून येणाऱ्या बस सायन रुग्णालयाआधीच्या सिग्नलवरून डावीकडे वळसा घेणार आहेत.

२) ११ मर्यादित ही बस वांद्रे वसाहत, कलानगर मार्गे टी जंक्शन येथून सुलोचना सेठी मार्गाने लो. टिळक रुग्णालय मार्गे नेव्हीनगर येथे जाईल.

३) बस क्रमांक १८१, २५५ म., ३४८ म., ३५५ म. या बस कलानगर मार्गे टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालय, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे जातील.

४) बस क्र. ए ३७६ ही राणी लक्ष्मीबाई चौकातून लोकमान्य टिळक रुग्णालय सुलोचना सेठी मार्गाने बनवारी कॅम्प, रहेजा मार्गे माहीम येथे जाईल.

५) सी ३०५ बस धारावी आगारातून पिवळा बांगला टी जंक्शन व सेठी मार्गाने टिळक रुग्णालयापासून बॅकबे आगार येथे जाईल.

६) बस क्र. ३५६ म., ए ३७५ व सी ५०५ या बस कलानगर बीकेसी कनेक्टरहून प्रियदर्शनी येथे जातील.

७) बस क्र ७ म., २२ म., २५ म. व ४११ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना सेठी मार्गाने लोकमान्य टिळक रुग्णालय मार्गे जातील.

८) बस क्र. ३१२ व ए ३४१ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून टी जंक्शन व सेठी मार्गाने राणी लक्ष्मी चौक येथून जातील.

९) बस क्र. एसी ७२ भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार व सी ३०२ ही बस मुलुंड बसस्थानक ते काळा किल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

१०) बस क्र. १७६ व ४६३ या बस काळा किल्ला आगार येथून सुटतील व शिव स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर माटुंगा स्थानकाकडे जातील.

आणखी वाचा :

Hathras Stempede: सत्संग स्थळी येण्यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याचे दरवाजे होते अरुंद, दिली जात आहेत अनेक कारणे