Mumbai : गोरेगाव नेस्को कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज आणि मद्य सेवनामुळे दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेस्को व्यवस्थापनाशी संबंधित ५ जणांना अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
Mumbai : मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुलात आयोजित लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमानंतर प्रकृती खालावलेल्या विद्यार्थ्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कॉन्सर्टमध्ये काय घडले?
शनिवारी (११ एप्रिल) रात्री नेस्को संकुलात आयोजित लाईव्ह कॉन्सर्टला तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. यावेळी काही जणांनी अत्यधिक मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर काहींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू
जखमींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि गोरेगावमधील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका तरुणाचा लाईफलाईन रुग्णालयात मृत्यू झाला, तर एका तरुणीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या एका तरुणीची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
MBA विद्यार्थ्यांचा सहभाग
मृतांमध्ये जमुनालाल कॉलेजचे MBA शिकणारे एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेस्को व्यवस्थापनावर कारवाई
या प्रकरणात नेस्कोच्या इव्हेंट आणि एक्झिबिशन व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांना वनराई पोलिसांनी अटक केली आहे. कार्यक्रमादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रक्त नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत
मृत विद्यार्थ्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालांची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात ड्रग्जचा नेमका प्रकार आणि प्रमाण याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे.
पोलिसांवरही प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या ड्रग्सविरोधी कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहिती देण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोपही समोर आला आहे.


