- Home
- Mumbai
- MHADA lottery 2026: स्वप्नपूर्तीची संधी! मुंबईत म्हाडाची २६४० घरांसाठी बंपर लॉटरी; जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत
MHADA lottery 2026: स्वप्नपूर्तीची संधी! मुंबईत म्हाडाची २६४० घरांसाठी बंपर लॉटरी; जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत
MHADA lottery 2026: मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने २६४० घरांची लॉटरी जाहीर केली आहे. ३० मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या या सोडतीत गोरेगाव, बोरीवली, चेंबूर अशा मोक्याच्या ठिकाणी अत्यल्प ते उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध आहेत.

मुंबईत म्हाडाची २६४० घरांसाठी बंपर लॉटरी
मुंबई: मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २६४० सदनिकांची बहुप्रतीक्षित सोडत जाहीर केली असून, ३० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता या प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ होणार आहे.
कुठे आणि किती घरे उपलब्ध?
या लॉटरीमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. एकूण घरांची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
अत्यल्प उत्पन्न गट (EWS): १४५ घरे
अल्प उत्पन्न गट (LIG): ८५८ घरे
मध्यम उत्पन्न गट (MIG): १४०८ घरे
उच्च उत्पन्न गट (HIG): २२९ घरे
प्रमुख ठिकाणे
विक्रोळी (कन्नमवार नगर), गोरेगाव (पत्राचाळ), बोरीवली (मागाठाणे व गोराई), चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई आणि दादर यांसारख्या प्राइम लोकेशन्सवर ही घरे उपलब्ध आहेत.
अर्ज कसा करायचा? (संपूर्ण प्रक्रिया)
म्हाडाने आता अर्ज प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सोपी केली आहे. 'IHLMS 2.0' या अत्याधुनिक प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता:
मोबाईल ॲप: गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून 'Mhada Housing Lottery System' डाऊनलोड करा.
अधिकृत वेबसाईट: https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नोंदणी: आवश्यक माहिती भरून तुमची नोंदणी पूर्ण करा.
महत्त्वाच्या तारखा विसरू नका!
अर्ज भरण्यास सुरुवात: ३० मार्च २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)
अनामत रक्कम (Deposit) भरण्याची मुदत: ३० एप्रिल २०२६
पात्र अर्जदारांची अंतिम यादी: १२ मे २०२६
सोडतीचा निकाल (Lucky Draw): १५ मे २०२६ (सकाळी)
उत्पन्न मर्यादा आणि पात्रता
तुमच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार तुम्ही खालील गटात अर्ज करू शकता.
उत्पन्न गट,वार्षिक उत्पन्न मर्यादा,कोणत्या गटात अर्ज करू शकता?
अत्यल्प (EWS),६ लाख रुपयांपर्यंत,अत्यल्प आणि अल्प
अल्प (LIG),९ लाख रुपयांपर्यंत,अल्प आणि मध्यम
मध्यम (MIG),१२ लाख रुपयांपर्यंत,मध्यम आणि उच्च
उच्च (HIG),१२ लाखांच्या वर,फक्त उच्च गट
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, पॅन कार्ड, १५ वर्षांचा महाराष्ट्रातील रहिवासी दाखला (Domicile) आणि १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा.
सावधान: म्हाडाने घरांच्या विक्रीसाठी कोणताही एजंट किंवा मध्यस्थ नेमलेला नाही. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि फसवणुकीपासून सावध राहा.

