Mumbai Local Update : मुंबईत गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

 Mumbai Local Updates : मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावत शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. कमी दृश्यमानतेमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या कमी दृश्यमानतेचा परिणाम मुंबईच्या मध्य रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुख्य मार्ग (Main Line) आणि हार्बर मार्गावरील (Harbour Line) लोकल गाड्या सध्या सुमारे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवावे. याशिवाय प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतुकीचा वेग मंदावला

सततच्या मुसळधार पावसामुळे अंधेरी, कुर्ला पूर्व, एस. जी. बर्वे रोड, सिंधी सोसायटी, चेंबूर, किंग्ज सर्कल आणि गांधी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी IMD चा रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'नाऊकास्ट रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील काही तासांत काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सखल भागात जाणे टाळावे, कमकुवत इमारती, झाडे आणि वीज खांबांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलुंडमध्ये सर्वाधिक 230.8 मिमी पावसाची नोंद

गेल्या 24 तासांत मुंबईच्या पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुलुंडमधील मिठागर महानगरपालिका शाळा परिसरात तब्बल 230.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मानखुर्द अग्निशमन केंद्र येथे 228.6 मिमी, एस वॉर्ड कार्यालय परिसरात 227 मिमी, एफ साऊथ वॉर्ड कार्यालयात 223.8 मिमी. याशिवाय वडाळ्यातील बी. नाडकर्णी पार्क महानगरपालिका शाळा परिसरात 206.2 मिमी पाऊस झाला.

पश्चिम उपनगरातही मुसळधार पाऊस झाला असून सांताक्रूझ कार्यशाळा परिसरात 223.4 मिमी, नारळवाडी शाळेत 222.2 मिमी, अंधेरी अग्निशमन केंद्रात 213.2 मिमी, के-पूर्व विभागात 200.8 मिमी आणि के-पश्चिम विभागात 200.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.