येत्या 31 ऑगस्ट रोजी असलेल्या रविवारी लोकल ब्लॉक घेण्यात आला आहे. अशातत तुम्ही गणपती पाहण्यासाठी लालबाग-परळला येण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक पाहा. याशिवाय मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळेही तुम्हाला लोकलमध्ये गर्दीचा सामना करावा लागू शकतो.
मुंबई : रविवार हा बहुतांश मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस असतो. खरेदी, फिरणे किंवा खासकरून सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात गणपती दर्शनासाठी अनेक जण बाहेर पडतात. मात्र, येत्या 31 ऑगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाने मोठा मेगाब्लॉक जाहीर केला असून त्यामुळे मुंबईकरांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वेची देखभाल-दुरुस्तीची कामे
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनचा थांबा रद्द करण्यात येईल. गणेशभक्त प्रामुख्याने लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनासाठी या स्टेशनांवर उतरतात. त्यामुळे प्रवास अधिक त्रासदायक होण्याची शक्यता आहे.
भक्तांना पर्यायी मार्गाचा वापर
गणेशोत्सवात रविवारी सुट्टीमुळे दर्शनासाठी गर्दी वाढते. मात्र, या ब्लॉकमुळे भक्तांना थेट चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर उतरता येणार नाही. प्रवाशांना दादर किंवा परळ स्टेशनवर उतरून पुढे प्रवास करावा लागेल. यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
जरांगे आंदोलनामुळे लोकलमध्ये वाढणार ताण
गणपती दर्शनासोबतच रविवारी मुंबईत मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आझाद मैदानावर सुरूच राहणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे स्थानिक गाड्यांमध्ये आधीच गर्दी वाढली आहे. अशा वेळी मेगाब्लॉक झाल्याने प्रवाशांची कोंडी अधिक होणार असून गणेशभक्त आणि आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते दोघांनाही प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागेल.
मध्य रेल्वेचा ब्लॉक वेळापत्रक
सेंट्रल लाईन: सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 या वेळेत सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक.
हार्बर लाईन: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक.
वेस्टर्न लाईनवर ब्लॉक नाही
वेस्टर्न लाईनवर शनिवारी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल येथे ब्लॉक असेल. मात्र रविवारी दिवसा वेस्टर्न लाईनवर कोणताही ब्लॉक नसेल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

