- Home
- Mumbai
- Mumbai Local Mega Block Alert: रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार तीन-तेरा!
Mumbai Local Mega Block Alert: रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार तीन-तेरा!
Mumbai Local Mega Block: रविवारी, २६ ऑक्टोबरला मुंबईच्या मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर मोठा मेगाब्लॉक जाहीर केलाय. या काळात अनेक लोकल गाड्या रद्द होतील, विलंबाने धावतील, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे.

उद्या तिन्ही मार्गांवर मोठा मेगाब्लॉक
मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 26 ऑक्टोबर, रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा काही वेळांसाठी बंद राहणार असून, काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान कामे
रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड या दरम्यानच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत असेल. या काळात सीएसएमटीहून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल्सना माटुंगा ते मुलुंडदरम्यान स्लो मार्गावर वळवले जाणार आहे. ठाण्यानंतर या गाड्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. सर्व लोकल सेवा या काळात सुमारे 15 मिनिटांनी उशिरा धावतील.
पश्चिम रेल्वेचा रात्रीचा ब्लॉक, वसई रोड ते भाईंदर दरम्यान
पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री घेतला जाणार आहे. वसई रोड ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक रात्री 1:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत राहील. या दरम्यान विरार-भाईंदर आणि बोरिवली दरम्यान धावणाऱ्या काही जलद लोकल्सना धीम्या मार्गावर वळवले जाईल, तर काही सेवा पूर्णपणे रद्द करण्यात येतील. मात्र, रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.
हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरही परिणाम
हार्बर लाईनवरही ठाणे–वाशी/नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हा ब्लॉक सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत असेल.
या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन सेवा पूर्णपणे बंद राहतील.
ठाण्याहून सुटणाऱ्या तसेच पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांसाठी सूचना
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, रविवारच्या प्रवासाचे नियोजन करताना या ब्लॉकची माहिती लक्षात घेऊनच बाहेर पडावे. कामकाज आणि देखभालीच्या दृष्टीने हा ब्लॉक अत्यंत महत्त्वाचा असून, प्रवाशांनी रेल्वेच्या पर्यायी व्यवस्थांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

