सार

Mumbai Heavy Rain Monsoon Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Mumbai Heavy Rain Monsoon Updates : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून रविवारी सकाळपासूनही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दादर, वरळी या भागांत दमदार पावसाने हजेरी लावली असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

"मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व पावसाचा जोर पाहता नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं," असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच खबरदारी घ्या व आपत्कालीन परिस्थितीत #१०० डायल करा, असंही मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे गेला पाण्याखाली

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून अंधेरी पंप हाऊस परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तसंच या पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.

 

 

पुढील दोन दिवस कशी असणार राज्यातील पावसाची स्थिती?

22 जुलैचा हवामान अंदाज

या दिवशी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात पाच जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

23 जुलैचा हवामान अंदाज

या दिवशी केवळ रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकणातील इतर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा वगळता कोणत्याच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

चंद्रपुरात पावसाचा कहर, शेकडो घरं पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

राज्यात अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा, गडचिरोलीचा विदर्भाशी असणारा संपर्क तुटला